आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत विरोधकांवर सडकून टीका केली. जर सरकार चुकत असेल तर टीका केली पाहिजे. सरकार तुम्हाला कुठेही बोट दाखवायला जागा देत नाही. तसेच तुम्ही मुद्द्यावरच टीका केली पाहिजे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
विरोधी पक्षांवर निशाणा साधताना एकनाथ शिंदे म्हणाले की, विरोधकांची नेहमी एकच स्क्रिप्ट असते आणि एकच ड्राफ्ट असतो. पण एकाच स्क्रिप्टवर एकच चित्रपट बनवता येतो ना? त्यामुळे यांचे चित्रपट फ्लॉप होत आहेत. नाना पटोले तुम्हीच प्रामाणिकपणे कबुल करा की, तुम्ही जेव्हाही खासगीमध्ये भेटता तेव्हा कबूल करता की, आम्ही चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे जर सरकार चुकत असेल तरच टीका केली पाहिजे.
आम्हाला खोके खोके म्हणणारे आहेत त्यांनी आमच्याच खात्यातून 50 कोटी घेतले आहेत. त्यामुळे त्यांची आता चौकशी सुरू आहे. त्यांनी शिवसेनेच्या खात्यातील पन्नास कोटी घेतले आहेत, असा गंभीर आरोप एकनाथ शिंदेंनी केला आहे.
पक्ष आणि चिन्ह चोरले म्हणून तयतयाट करायचा, हे रोजच सुरू आहे. अशी ही नवीन राजकीय संस्कृती निर्माण झाली आहे ते बरोबर नाही. ज्यांनी स्वार्थासाठी विचार विकले आहेत त्यांनी अशाप्रकराचा कांगावा करणे हास्यास्पद आहे. सारखं चोरलं म्हणून बोलायचं ही कोणती भूमिका आहे? अरे बोलायचे असेल तर मर्दासारखे बोलाना, अशी टीकाही एकनाथ शिंदेंनी केली.