केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, सहकार क्षेत्र समृद्ध करण्यासाठी आता प्रत्येक शहरात किमान एक नागरी सहकारी बँक स्थापन केली जाईल. सहकारी बँका ही सर्वसामान्यांच्या समृद्धीचा मार्ग असल्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. शनिवारी राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त व विकास महामंडळाच्या (NUCFDC) उद्घाटनानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
RBI ने NUCFDC ला नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी आणि अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंगसाठी स्वयं-नियामक संस्था म्हणून काम करण्यास संमती दिली आहे. यावेळी अमित शाह यांच्यासह सहकार राज्यमंत्री बी.एल.वर्मा, वित्त राज्यमंत्री भागवत किशनराव कराड, सहकार सचिव आशिष भुतानी, एनयूसीएफडीसीचे अध्यक्ष ज्योतिंद्र मेहता उपस्थित होते.
यावेळी अमित शाह म्हणाले की, जोपर्यंत सहकारी संस्थांना बळ दिले जात नाही, तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही. जवळपास 20 वर्षांच्या संघर्षानंतर आज NUCFDC ची स्थापना होत आहे. एक छत्र संस्था बनल्याने नागरी सहकारी बँकांचा विकास अनेक पटींनी वाढेल. हे लहान बँकांसाठी सुरक्षिततेचे जाळे म्हणून काम करेल. त्यामुळे ठेवीदारांचा आत्मविश्वास वाढेल आणि आगामी काळात काम वाढेल.
पुढे ते म्हणाले, आपण विश्वासार्हतेसाठी काळानुरूप स्वतःमध्ये बदल करत राहणे आणि बँकिंग नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या संस्थेने सहकारी वित्तीय क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या संस्थांचे बँकांमध्ये रूपांतर करण्याची व्यवस्था करावी. लहान बँकांना बँकिंग नियमांसाठी तयार करणे हे त्याचे विशेष काम असावे.
प्रत्येक शहरात सहकारी बँक निर्माण करण्याचे काम झाले पाहिजे. देशभरात व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधांची पूर्तता करण्याचीही व्यवस्था करावी लागेल. आज आमच्याकडे दीड हजार बँकांच्या 11 हजार शाखांमध्ये 5 लाख कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. तसेच 3.5 लाख कोटी रुपयांची साठवणूक कर्ज क्षमता आहे. ही महान शक्ती आहे. ती वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवून पुढे जायचे आहे. नागरी सहकारी बँकांनी त्यांचा निव्वळ एनपीए दर 2.10 टक्क्यांवर आणला ही चांगली गोष्ट आहे. यामध्ये आणखी सुधारणा करण्याची गरज आहे, असेही अमित शाह म्हणाले.