भारतीय जनता पक्षाने (भाजप) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाराणसीतून, गृहमंत्री अमित शहा यांना गांधीनगरमधून, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना लखनऊमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या यादीत समाविष्ट झालेल्या उमेदवारांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. पंतप्रधानांनी ‘X’ वर लिहिले की, “आमच्या पक्षाने काही जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत आणि उर्वरित जागा येत्या काही दिवसांत जाहीर केल्या जातील. आमच्या पक्षाचे उमेदवार म्हणून ज्यांची नावे आहेत त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो.”
पंतप्रधानांनी लिहिले की, “आम्ही सुशासनाच्या आमच्या ट्रॅक रेकॉर्डच्या आधारे लोकांपर्यंत जात आहोत आणि आपल्या योजनांचा लाभ गरीबातील गरीबांपर्यंत पोहोचतील याची खात्री करत आहोत. मला खात्री आहे की भारतातील 140 कोटी जनता आम्हाला पुन्हा आशीर्वाद देतील.”
भाजपने ज्या 195 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत त्यापैकी 51 उत्तर प्रदेशातील, 26 पश्चिम बंगाल, 24 मध्य प्रदेश, 15 गुजरात, 15 राजस्थान, 12 केरळ, 9 तेलंगण, 14 पैकी 11 आसाममधील आहेत. यामध्ये झारखंडमधील 11, छत्तीसगडमधील 11, दिल्लीतील 5, जम्मू-काश्मीरमधील 2, उत्तराखंडमधील 3, अरुणाचल प्रदेश 2, गोव्यातील 1, त्रिपुरा 1, अंदमान-निकोबारमधील 1 आणि दमण दीवमधील 1 जागांचा समावेश आहे.