काही दिवसांपूर्वी मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. उपोषणादरम्यान मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला होता. अशातच आता पुन्हा एकदा जरांगेंनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत.
माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, गृहमंत्री हे जबाबदारीचे पद आहे. पण देवेंद्र फडणवीस हे कान फुंकण्याचे काम करत आहेत. त्यांनी एसपींचे, पीआय, पीएसआय यांचे कान फुंकले आहेत. पूर्वी ग्रामीण भागात मुल जन्माला आले की आत्या त्याचे कान फुंकायची. तसेच सध्या देवेंद्र फडणवीस हे आत्याच्या भूमिकेत आहेत, अशी टीका जरांगेंनी केी आहे.
पुढे ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांचा माझी हत्या करण्याचा डाव आहे. माझ्या अंगावर कार्यकर्ते घालण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. तसेच पोलिसांना हाताशी धरून कान भरण्याचा उद्योग सुरू आहे, असे आरोप जरांगेंनी केले आहेत.
सरकारने सगेसोयऱ्याची अंमलबजावणी केली पाहिजे. आम्ही 8 किंवा 9 तारखेपर्यंत वाट बघू, नाहीतर ते किती दडपशाही करतात ते बघून घेऊ. माझ्यावर महिलांच्या अडून किंवा कार्यकर्त्यांकडून हल्ला केला जाऊ शकतो. पण मी मागे हटणार नाही, मीही बघून घेणार आहे, असेही मनोज जरांगे म्हणाले.