लोकसभा निवडणुकासाठी भाजपने 195 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. तर भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर भोजपुरी गायक आणि भाजप उमेदवार पवन सिंह यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. पवन सिंह यांनी याबाबतची माहिती स्वत: ट्विट करत दिली आहे.
पवन सिंह यांनी आसनसोल लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट केले आहे. मी भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाचे मनापासून आभार मानतो. माझ्यावर पक्षाने विश्वास टाकून आसनसोल लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली. पण काही कारणांमुळे मी आसनसोल मतदारसंघातून निवडणूक लढवू शकत नाही, अशी माहिती पवन सिंह यांनी दिली आहे.
काल भाजपने 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. या यादीमध्ये पवन सिंह यांच्या नावाचा समावेश होता. पण आता पवन सिंह यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिल्यामुळे आसनसोल मतदारसंघासाठी कोणत्या नवीन उमेदवाराचे नाव निश्चित होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने 195 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर गृहमंत्री अमित शाह गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे म्हणाले, “16 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 195 जागांसाठी निवडणूक उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. या यादीत 34 केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांचीही नावे आहेत.”