छोट्या पडद्यावरील ‘इश्कबाज’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुरभी चंदना लग्नबंधनात अडकली आहे. सुरभी चंदनाने तिचा प्रियकर करण शर्मासोबत लग्नगाठ बांधली आहे. काल (2 मार्च) सुरभी आणि करण यांचा शाही विवाहसोहळा राजस्थानमधील जयपूर येथे मोठ्या थाटात पार पडला. तर सध्या या दोघांच्या लग्नाचे खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
सुरभी आणि करणने जयपूरमध्ये लग्नगाठ बांधली आहे. या दोघांनी लग्नासाठी खास लूक केला होता. सुरभीने लग्नासाठी सी-ग्रीन कलरचा लेहंगा परिधान करत त्यावर पिंक कलरची ओढणी घेतली होती. तसेच या लेहेंग्यावर तिने स्टोनची ज्वेलरी घातली होती, ज्यात ती खुपच सुंदर दिसत होती. तर करणने ग्रे कलरची शेरवानी परिधान केली होती. तर करण आणि सुरभीच्या या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
सध्या सुरभी आणि करणचे लग्नसोहळ्यातील काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये सुरभी ‘मुझे प्यार हुआ था’ या गाण्यावर डान्स करत लग्नमंडपात एन्ट्री करताना दिसत आहे. तर सुरभी आणि करणच्या लग्नाचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, गेल्या 13 वर्षांपासून सुरभी आणि करण एकमेकांना डेट करत आहेत. तर दोघांनी 15 जानेवारी 2024 रोजी सोशल मीडियावर त्यांच्या एंगेजमेंटची घोषणा केली होती. अशातच आज या दोघांनी जयपूरमध्ये लग्नगाठ बांधली आहे.
सुरभी ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा चाहता वर्गही लाखोंच्या संख्येत आहेत. ती सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणाच सक्रिय असते. तसेच सुरभीने इश्कबाजसोबत नागिन या मालिकेत काम केले आहे. तसेच तिने ‘रक्षक इंडियाज बेव्स चॅप्टर 2’ या वेब सीरिजमध्येही काम केले आहे.