पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा पक्ष भाजपसाठी देणगी दिली आहे. पंतप्रधान मोदींनी पक्षाला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी डोनेशन फॉर नेशन बिल्डिंग मोहिमेअंतर्गत देणगी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या पक्ष निधीसाठी 2,000 रुपयांची देणगी दिली आहे. तसेच या देणगीची स्लिपही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. ही देणगीची स्लिप शेअर करत पंतप्रधान मोदींनी लोकांना आवाहन केले आणि म्हटले की, भाजपमध्ये योगदाना देताना आणि विकसित भारताच्या उभारणीसाठी आमच्या प्रयत्नांना बळ देताना मला आनंद होत आहे. तसेच मी प्रत्येकाला NaMoApp द्वारे राष्ट्र उभारणीसाठी देणगीचा भाग बनण्याचे आवाहन करतो.
या पोस्टमध्ये पंतप्रधानांनी भारतीय जनता पक्षाला देणगी देऊ शकेल यासाठी NaMoApp ची लिंक देखील शेअर केली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही भाजपला देणगी देऊ शकता. ज्याला देणगी द्यायची आहे तो या लिंकवर आवश्यक तपशील भरून नंतर त्याच्या देणगीची रक्कम टाकून देणगी देऊ शकतो. पीएम मोदींशिवाय भाजपच्या इतर अनेक नेत्यांनी यासाठी देणगी दिली आहे.
https://twitter.com/narendramodi/status/1764216867617406999
दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने 195 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर गृहमंत्री अमित शाह गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे म्हणाले, “16 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 195 जागांसाठी निवडणूक उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. या यादीत 34 केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांचीही नावे आहेत.”