डोंबिवली, ३ मार्च : सरकार मोठ्या प्रमाणावर आरोग्यावर काम करत आहे. तसेच राज्यात कॅशलेस सेवेवर भर आहे. 4 कोटी महिलांची आरोग्य तपासणी केली. केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजनेचाही लाभ मिळतोय. राज्य व केंद्र सरकार मिळून विकास कामे, परदेशी गुंतवणूक देशात होत आहे त्यामुळे रोजगार वाढणार आहे. राज्याच्या विकासाबरोबर डबल इंजिन सरकार जनतेच्या आरोग्याची काळजी घेत आहे असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीत केले.
रविवारी डोंबिवलीतील प्रीमियर मैदान, कल्याण-शिळफाटा रोड येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आले होते. त्यापूर्वी मुख्यमंत्री यांच्या हस्ते डोंबिवलीतील टिळक रस्त्यावर जुन्या सूतिकागृह जागेवर अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या सूतिकागृहसह इतर उपक्रमांचे भूमिपूजन केले. यावेळी व्यासपीठावर राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, पालिका आयुक्त डॉ. इंदूरणी जाखड, शिवसेना जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे, शिवसेना आणि भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुतिकागृह व कॅन्सर रुग्णालयचे भुमीपुजन, फिश मार्केट डोंबिवली (पश्चिम) चे ऑनलाईन भुमीपुजन, आयरे गाव डोंबिवली (पूर्व) येथील महाराष्ट्र भुषण नानासाहेब धर्माधिकारी सभागृहाचे ऑनलाईन भुमीपुजन तसेच शास्त्रीनगर रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्र व नवजात शिशु अतिदक्षता विभाग (एनआयसीयु) चे ऑनलाईन लोकार्पण आणि डोंबिवली (पूर्व) सुनिलनगर येथील अभ्यासिकेचे ऑनलाईन उद्घाटन व लोकार्पण हे कार्यक्रम देखील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते झाले.
यावेळी मुख्यमंत्री पुढे म्हणाले, देशाचे पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्र राज्याला मोठं पाठबळ दिले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात वन ट्रिलीयन डॉलर इकोनॉमी अचिव्ह करणार आहोत. महाराष्ट्रातुन 45 अधिक जागा आणि देशात 400 पार आकडा पार करण्यासाठी महाराष्ट्र कमी पडणार नाही.
तर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, पालिका आयुक्त यांना माहित आहे कि, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना पालिकेच्या रुग्णालयात डॉक्टर्स व कर्मचारी यांची मंजुरी घेतली होती. आता जाहिरात काढली जाते. मात्र त्यात डॉक्टर्स उपलब्ध होत नाही. आता प्रशासकीय राजवट सुरु असून तुटपुंजा पगारावर डॉक्टर काम कसे करतील. मला खात्री आहे कि आरोग्य सेवा चांगली असावी म्हणून चांगल्या पगारावर तज्ञ डॉक्टर नेमावेत. याची पालिकेने याची बजेटमध्ये तरतूद केली पाहिजे.
स्थानिक नागरिक बाळा म्हात्रे यांसह नागरिकांनी फिश मार्केट होणार असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन आभार मानले.
कॅन्सर व प्रसुती रुग्णालय सुतिकागृह :
डोंबिवली पूर्व येथील जुने सुतिकागृह तळ अधिक 1 मजली असून ते 1963 मध्ये बांधण्यात आले होते. सदर सुतिकागृहाची दुरुस्ती किफायतशीर नसल्याने महापालिकेच्या मालकीच्या भूखंडाचा पूर्ण क्षमतेने वापर करण्यासाठी या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कर्करोग ग्रस्त रुग्णांना महानगरपालिका क्षेत्रात महापालिकेची आरोग्य सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे अशा रुग्णांना उपचारासाठी मुंबई, ठाणे येथील रुग्णालयांमध्ये जावे लागते. परिणामी येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या कर्करोग रुग्णालयामुळे कर्करोगग्रस्त रुग्णांना नजीकच म्हणजे महानगरपालिका क्षेत्रात उपचार उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे रुग्णांचा प्रवासाचा त्रास आणि वेळ वाचणार आहे. सदर रुग्णालयामध्ये रेडिओथेरपी, केमोथेरपी आणि शस्त्रक्रिया आदी कर्करोगावरील उपचार उपलब्ध होणार आहेत. या रुग्णालयामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत पात्र रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध होणार आहेत. तसेच या रुग्णालयामध्ये प्रसूती विषयक सर्व सेवा मोफत उपलब्ध होणार आहेत. हे नवीन बांधण्यात येणारे कॅन्सर व प्रसुती रुग्णालय तळ अधिक 8 मजली असून त्याचे क्षेत्रफळ 3219 चौ.मी. आहे. त्यामध्ये 150 बेड्स सुविधा असून यात 100 बेड्स कर्करोग ग्रस्त व 50 बेड्सचे प्रसुतीगृह सुरू करण्यात येणार आहे. या कामासाठी मे.एअरबॉर्न इंडस्ट्रिज यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सदरच्या कामासाठी अंदाजीत 207 कोटी इतका खर्च अपेक्षित असून पीपीपी तत्वावर कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि मे आपुलकी हेल्थ केअर प्रा. लि. यांचे संयुक्त विद्यमाने चालविण्यात येणार आहे.
मासळी मार्केट :
विष्णूनगर डोंबिवली पश्चिम येथील सध्याचे मासळी मार्केट पाडून पुनर्बांधणी प्रस्तावित आहे. आरक्षण क्र. 39 विद्यमान मासळी बाजार क्षेत्र 870 चौमी व आरक्षण क्र. 40 हॉकर्स झोन क्षेत्रफळ 510 चौमी. असे एकूण भूखंड क्षेत्रफळ 1380 चौमी आहे. सद्यस्थितीतील मासळी बाजार 40 वर्षाहून अधिक जूने व जिर्ण अवस्थेत आहे. तेथे व्यवस्थित प्लीन्थ, ड्रेनेजची व्यवस्था नाही या मासळी बाजारात मटण आणि चिकन मार्केटही आहे. परंतु सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नाही. सदरचा मासळी बाजार मुख्य रस्त्यालगत असून डोंबिवली रेल्वे स्टेशनच्या अगदी समोर आहे. फिश मार्केट, मटण व चिकन मार्केट साठी त्याठिकाणी नवीन तळ अधिक 2 मजल्याची इमारत अद्यावत उद्वाहनासह बांधण्यात येणार आहे. या कामाकरीता एकूण खर्च रक्कम रु.7 कोटी 81 लाख अपेक्षित असून कामाचे आराखडे व प्रकल्प अहवाल तयार केले आहे व मे.अकॉर्ड असोसिएटस या संस्थेमार्फत बांधकाम करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी सभागृह :
डोंबिवली पूर्व येथील दत्तनगर, आयरे रोड येथे प्रस्तावित महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी सभागृह, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उद्यान व संत ज्ञानेश्वर माऊली उद्यान असून याचे संपूर्ण क्षेत्रफळ 582.00 चौ.मी. इतके आहे. सदर इमारत तळ 1 मजली असून यामध्ये किर्तनासाठीसभागृह, प्रवेशद्वार, वाहनांसाठी पार्किंग, स्टेज, स्टोर रुम, ऑफिस, जॉगिग ट्रॅक, लहान मुलांसाठी खेळण्याची जागा, एम्फिथिएटर, वयोवृध्द नागरीकांना बसण्यासाठी व्यवस्था, योगा व व्यायामाची साधने अशा सर्व सोयी सुविधायुक्त असे सभागृह व उद्याने तयार करण्यात येणार आहेत. सदर कामासाठी सुमारे रक्कम रु. 4 कोटी खर्च इतका अपेक्षित आहे.