देशात एप्रिल मे महिन्यात लोकसभेची निवडणूक होणार आहे. या महिन्यात निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच आचारसंहिता देखील लागू होण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपापली रणनीती , प्रचाराची तयारी आणि जागावाटपासंदर्भात चर्चा सुरु केली आहे. तसेच विरोधकांनी नेहमीप्रमाणे निवडणूक जवळ येताच EVM मशीनवरून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. कालच्या आपल्या एका सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी ईव्हीएम मशीनवरून टीका केली आहे. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला जनतेचा कौल नसल्याने हे सरकार सत्तेत येणार नाही. मात्र जनतेच्या मनाविरुद्ध ईव्हीएमचा घोटाळा करून भाजपा जिंकले तर मोठा असंतोष निर्माण होईल अशी टीका ठाकरेंनी केली होती. त्याला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे. ठाकरेंनी केलेल्या टिकेबद्दल माध्यमांनी फडणवीसांना विचारले असता, फडणवीस म्हणाले, ”याच्यावर आता उत्तर देण्यादेखील लायक राहिले नाहीये. कारण या लोकांची सवय आहे. हे जिंकले तर ईव्हीएम चांगले आणि हे हरले तर ईव्हीएम वाईट. त्यांचा या निवडणुकीत दारुण पराभव होणार आहे, हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे आधीच त्यांनी ईव्हीएमबद्दल बोलायला सुरुवात केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वाना ओपन चॅलेंज दिले आहे. ईव्हीएम मशीन हॅक करून दाखवा असे चॅलेंज दिले आहे. मात्र एकही राजकीय पक्ष ते करू शकलेले नाही.”
देशात लोकसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात तारखा जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी आपापली तयारी सुरु केली आहे. ‘इंडी’ आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. त्यातच भाजपात उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. आज उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता असून, पहिल्या यादीमध्ये १०० जणांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांच्या नावाचा समावेश असण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधीच निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. अब की बार ४०० पार असा नारा त्यांनी दिला आहे.