पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणातील आदिलाबाद येथे 56,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्राला समर्पित केले. ऊर्जा, रेल्वे आणि रस्ते क्षेत्राशी संबंधित अनेक प्रकल्पांचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी पंतप्रधान मोदींचा ‘अंगवस्त्र’ देऊन सत्कार केला. तसेच राज्य भाजपचे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी पंतप्रधानांना भगवान व्यंकटेश्वराचे स्मृतिचिन्ह सादर केले. या कार्यक्रमाला तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदराजनही उपस्थित होत्या.
“आज आदिलाबादची भूमी केवळ तेलंगणासाठीच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासाच्या अनेक ट्रेंडची साक्षीदार आहे. आज मला येथील 30 हून अधिक विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्याची संधी मिळाली. 56 हजार कोटींहून अधिक किमतीचे हे प्रकल्प आहेत. तसेच आम्ही तेलंगणासह देशातील अनेक राज्यांमध्ये विकासाचा नवा अध्याय लिहू”, असे पंतप्रधानांनी या मेळाव्याला संबोधित करताना सांगितले.
PM मोदींनी NTPC चा 800 मेगावॅट (युनिट-2) तेलंगणा सुपर थर्मल पॉवर प्रकल्प तेलंगणातील पेड्डापल्ली येथे आणि 660 मेगावॅटचा उत्तर करणपुरा सुपर थर्मल पॉवर प्रकल्प झारखंडच्या चतरा येथे समर्पित केला. हा देशातील पहिला सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्रकल्प आहे ज्याची संकल्पना एवढ्या मोठ्या प्रमाणात एअर कूल्ड कंडेन्सर (ACC) ने केली आहे, जी पारंपारिक वॉटर-कूल्ड कंडेन्सरच्या तुलनेत पाण्याचा वापर 1/3 पर्यंत कमी करते. या प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आला.
केंद्राने तेलंगणासाठी हाती घेतलेल्या विकासकामांवर पंतप्रधानांनी भर दिला. ते म्हणाले, “आज प्रत्येकजण भारताच्या विकासाच्या गतीबद्दल बोलत आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये भारतात काम करण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. आमच्या सरकारने तेलंगणाची विशेष काळजी घेतली आहे. आमच्यासाठी विकास म्हणजे उपेक्षितांची प्रगती आहे,” असे मोदी म्हणाले.
“तेलंगणा आपल्या स्थापनेला 10 वर्षे पूर्ण करणार आहे. लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आम्ही 800 मेगावॅट ऊर्जा निर्मितीची क्षमता असलेल्या एनटीपीसीच्या दुसऱ्या युनिटचे उद्घाटन केले आहे”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील जालौन येथे बुंदेलखंड सौर ऊर्जा लिमिटेडच्या (BSUL’s) 1200 मेगावॅट जालौन अल्ट्रा मेगा रिन्यूएबल एनर्जी पॉवर पार्कची पायाभरणी केली. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशातील जालौन आणि कानपूर देहात येथे सतलज जल विद्युत निगम (SJVN) च्या तीन सौर ऊर्जा प्रकल्पांचे तसेच उत्तराखंडच्या उत्तरकाशीमधील संबंधित ट्रान्समिशन लाइनसह नैटवार मोरी हायड्रो पॉवर स्टेशनचे उद्घाटन केले.
पुढे पंतप्रधान मोदींनी रिन्यूएबल एनर्जीमधून 2500 मेगावॅट वीज बाहेर काढण्यासाठी ReNew च्या कोप्पल-नरेंद्र ट्रान्समिशन योजनेचे उद्घाटन केले. तसेच दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन आणि इंडिग्रीडच्या ऊर्जा क्षेत्राशी संबंधित इतर प्रकल्पांचेही पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
पंतप्रधानांनी नवीन विद्युतीकृत अंबारी – आदिलाबाद – पिंपळखुटी रेल्वे मार्ग राष्ट्राला समर्पित केला. तेलंगणाला महाराष्ट्राशी आणि तेलंगणाला छत्तीसगडशी NH-353B आणि NH-163 द्वारे जोडणाऱ्या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणीही त्यांनी केली.