आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन अकराला नांदगाव सदो (ता. इगतपुरी) येथे होणार आहे. तर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ हे अध्यक्षस्थानी असतील.
हा सोहळा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. भरवीर ते इगतपुरीदरम्यानचा समृद्धी महामार्गाचा हा तिसरा टप्पा आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील 24.872 किलोमीटर लांबीचा मार्ग हा एकून सोळा गावांमधून जात आहे.
समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचा खर्च 1 हजार 78 कोटी एवढा आहे. तसेच या तिसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणामुळे 701 किलोमीटरपैकी आता एकूण 625 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीस उपलब्ध झाला आहे. तसेच उर्वरित मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे.
या महामार्गामुळे मुंबई आणि ठाणे येथून जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुलभ तसेच जलद होणार आहे. यामुळे प्रवाशांना एका तासातच शिर्डीला पोहचता येणार आहे.