राजन साळवींची एसीबी चौकश
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यामागील चौकशीचा फेरा अजूनही संपलेला दिसत नाहीये. कारण आज पुन्हा एकदा आमदार राजन साळवी यांची एसीबी चौकशी होणार आहे. जानेवारी महिन्यात एसीबीने आमदार राजन साळवी यांच्या घरावर बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात छापेमारी केली होती. अवैध मालमत्ता प्रकरणी एसीबीने तक्रार दिल्यानंतर राजन साळवी, त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज दुपारी राजन साळवी यांची रत्नागिरीतील एसीबी कार्यालयात चौकशी होणार आहे. राजन साळवी, त्यांची पत्नी, मुलगा यांची आधीदेखील एसीबी चौकशी झाली आहे. दरम्यान राजन साळवी यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यावर सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबियांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मात्र चौकशीला सहकार्य करण्याचे निर्देश कोर्टाने साळवी यांना दिले आहेत. त्याप्रमाणे साळवी आणि त्यांचे कुटुंबीय चौकशीला सहकार्य करणार आहेत.
EVM मशीनवरून घमासान
देशात एप्रिल मे महिन्यात लोकसभेची निवडणूक होणार आहे. या महिन्यात निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच आचारसंहिता देखील लागू होण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपापली रणनीती , प्रचाराची तयारी आणि जागावाटपासंदर्भात चर्चा सुरु केली आहे. तसेच विरोधकांनी नेहमीप्रमाणे निवडणूक जवळ येताच EVM मशीनवरून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
देशासह राज्याला अवकाळीचा फटका
देशात आणि राज्यातील वातावरणात गेल्या काही दिवसांमध्ये विविध बदल पाहायला मिळत आहे. राज्यातील आणि देशातील काही भागात अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे. दोन दिवसांपूर्वी पुणे शहरात देखील पावसाने हजेरी लावली होती. एका ठिकाणी कडाक्याची थंडी आणि काही ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. दरम्यान देशभरात झालेल्या अवकाळी पावसामुळे देशभरात १२ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे. पुढील २४ तासांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे काही ठिकाणी हवेत गारठा पाहायला मिळत आहे. सकाळच्या वेळेस थंडी आणि दुपारच्या वेळेस कडक ऊन असे काहीसे वातावरणात बदल पाहायला मिळत आहेत.
अमित शहा दोन दिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
देशात लोकसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानिमित्ताने भाजपाने देखील जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील नेत्यांचे राज्यतील दौरे वाढले आहेत. गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ दौऱ्यावर आले होते. आता अमित शहा देखील राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. अमित शहा छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि अकोला जिल्ह्यातील कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. तसेच छत्रपती संभाजीनगर येथे अमित शहा सभेला संबोधित करणार आहेत. यामुळे शहा आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्यास जागावाटपाचा तिढा सुटणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
‘माझे जीवन एक खुले पुस्तक, मी त्यांच्या….”; पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘इंडी’ आघाडीवर जोरदार टीका
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ”देशातील १४० कोटी लोक हे माझे कुटुंब आहे आणि माझे जीवन एक खुले पुस्तक आहे. “भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरणात बुडलेले ‘इंडी’ आघाडीचे नेते चिंताग्रस्त होत आहेत. मी त्यांच्या ‘परिवार’वर प्रश्न उपस्थित केला तेव्हा ते मोदींना कुटुंब नाही असे म्हणून लागले.” पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, ” देशातील १४० कोटी जनता हेच माझे कुटुंब आहे. आज देशातील करोडो मुली, माता आणि बहिणी हे मोदींचे कुटुंब आहे. देशातील प्रत्येक गरीब व्यक्ती हे माझे कुटुंब आहे. ज्यांचे कोणीही नाही, ते सुद्धा मोदींचे आहेत आणि मोदी त्यांचे आहेत. ते म्हणतात ‘नेने मोदी कुटुंबम’ (मी मोदी परिवार आहे).”