तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन आणि मंत्री उदयनिधी यांनी एका कार्यक्रमात सनातन धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. काही आजार हे बरे होऊ शकत नाहीत. त्यांना संपवायलाच हवे. करोना, डेंग्यू, मलेरिया अशा रोगांना आपण बरे करू शकत नाही. त्यांना समूळ नष्ट केले पाहिजे. त्याप्रमाणे सनातन धर्मात सुधारणा होऊ शकत नाही, त्याला समूळ नष्ट करायला हवे असे उदयनिधी म्हणाले होते. या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने उदयनिधी यांना खडे बोल सुनावले आहेत.
आपण एक मंत्री आहात, तुम्ही सामान्य व्यक्ती नाही. त्यामुळे याचे परिणाम काय होऊ शकतात हे माहिती असणे आवश्यक आहे, असे खडे बोल सुप्रीम कोर्टाने तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन आणि मंत्री उदयनिधी यांना सुनावले आहेत. तुम्ही एका महत्वाच्या पदावर आहात. त्यामुळे तुम्हाला याबाबत होणाऱ्या परिणामांची जाणीव होईल पाहिजे असे कोर्टाने म्हटले आहे. यावर १५ मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे. सनातन धर्मावर टीका केल्यानंतर देशातील अनेक भागांमध्ये उदयनिधी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर उदयनिधी यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
उदयनिधी यांनी सनातन धर्मावर टीका केल्यानंतर भाजपा चांगलीच आक्रमक झाली होती. देशभरातील भाजपा नेत्यांनी उदयनीधी यांच्यावर टीका केली होती. यामाध्यमातून ‘इंडी’ आघाडी आणि काँग्रेसवर निशाणा साधला जात होता. उदयनिधी यांनी माफी मागावी अशी भाजपाची मागणी आहे. मात्र उदयनिधी आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्ट आता काय निर्णय देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.