पक्षाच्या कामकाजावर व्यक्त केली नाराजी
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार तापस रॉय यांनी आज, सोमवारी पक्षाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत पक्षाचा आणि आमदार पदाचा राजीनामा दिला आहे.
यासंदर्भात तापस रॉय म्हणाले की, आपण विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे मी आता एक मुक्त पक्षी आहे.’ जानेवारीत त्यांच्या निवासस्थानावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापा टाकला होता, तेव्हा पक्ष आपल्या पाठीशी उभा राहिला नाही, अशी टीका त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या पक्षनेतृत्वावर केली. याचबरोबर, तापस रॉय म्हणाले, गेल्या 25 वर्षांपासून मी पक्षाचा प्रामाणिक नेता आहे, पण मला कधीच माझे हक्क मिळाले नाहीत.
राज्य सरकारमधील मंत्री तापस रॉय हे बऱ्याच दिवसांपासून तृणमूल काँग्रेसवर नाराज होते. त्यामुळेच त्यांच्या राजीनाम्याची चर्चा राजकीय वर्तुळात वर्तविली जात होती. राजीनामा जाहीर करण्यापूर्वी तृणमूल काँग्रेस नेते कुणाल घोष आणि ब्रत्य बसू यांनी तापस रॉय यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती, पण या भेटीचा काहीही परिणाम झाला नाही. अखेर तापस रॉय यांनी राजीनामा दिला. दरम्यान राजीनामा दिल्यानंतर त्यांना भाजप प्रवेशाबाबत विचारले असता त्याबाबत बोलण्यास नकार दिला.