अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान खासदार नवनीत राणा यांची उमेदवारी निश्चित असल्याचे बोलले जात असतानाच शिवसेना शिंदे गटाकडून माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनीदेखील या मतदारसंघावर दावा करून मलाच उमेदवारी मिळेल, असे म्हटले आहे. त्यामुळे महायुतीत हा मतदारसंघ नेमका कोणता पक्ष लढविणार, असा संभ्रम निर्माण झाला असताना रविवारी आ. सुलभा खोडके वांच्याकडील विवाह सोहळ्यात आनंदराव अडसूळ यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. दोघांमध्ये बराच वेळ राजकीय चर्चा चालली. त्यामुळे राजकीय चर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
लोकसभेच्या अमरावती मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीमध्ये खा. नवनीत राणा आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. महायुतीमधून आपली उमेदवारी निश्चित असल्याचे सांगत खा. नवनीत राणा यांनी कामाला सुरुवात केली आहे. त्याचवेळी महायुतीमधील घटकपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ व त्यांचे पुत्र अभिजित अडसूळ हे दोघेही आमचा प्रचार करतील, असा टोलाही आ. रवी राणा यांनी लगावला आहे. त्याला प्रतिउत्तर देत अमरावती हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून यंदाही आम्हीच लढणार, असा दावा आनंदराव अडसूळ यांनी केला आहे. त्यामुळे महायुतीतील नेत्यांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघ महायुतीत कोणत्याही पक्षाच्या वाट्याला येणार आणि कुणाला उमेदवारी मिळणार, याबाबत राजकीय वर्तुव्यत चांगलीच चर्चा रंगली आहे. अशातच रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आ. सुलभा खोडके यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्याला शहरात आल्यावर आनंदराव अडसूळ यांनी त्यांची भेट घेतली. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा रंगली. त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे समोर आले नसले, तरी या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अमरावती लोकसभा मतदारसंघाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.