लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्व राजकीय पक्षांमध्ये हालचाली वाढल्या आहेत. त्यात सर्वजण मोठ्या नेत्यांसाठी आपल्या पक्षाची दारे उघडी करत आहेत. काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. अशातच आता अजित पवार गटातील एका बड्या नेत्याला शरद पवार गटातील खासदार अमोल कोल्हे यांनी पक्षप्रवेशासाठी खुली ऑफर दिली आहे.
शरद पवार यांच्यासोबत अजित पवार गटातील आमदार निलेश लंके यांची जवळीक वाढू लागली असल्याची चर्चा होत आहे. अशातच आता खासदार अमोल कोल्हे यांनी निलेश लंकेंना खुली ऑफर दिली आहे. अहमदनगरला निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. अमोल कोल्हे यांचे शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. तर या महानाट्याच्या समारोप कार्यक्रमात कोल्हेंनी लंकेंना शरद पवारांसोबत येण्याची ऑफर दिली आहे.
यावेळी अमोल कोल्हे म्हणाले की, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्लीच्या तक्त्याला घाम फोडणारा असा लोकनेता आता आमच्या खांद्याला खांदा लावून संसदेत यावे. तसेच याबाबत लोकनेत्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी नगर दक्षिणमध्ये वाजवलीच पाहिजे, असे म्हणत कोल्हेंनी लंकेंना नगर दक्षिण मतदार संघात लढण्याचे आवाहन केले आहे.
मला निलेश लंकेंच्या सामाजिक कामाचा कायम अभिमान वाटतो. कारण कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसाताना जेव्हा सर्वसामान्य कुटुंबातील माणसे जनतेच्या काळजावर अभिराज्य गाजवतात तेव्हा त्यांचा अभिमान सर्वांनाच वाटतो, असेही अमोल कोल्हे म्हणाले.
दरम्यान, अमोल कोल्हेंनी दिलेल्या या खुल्या ऑफरनंतर निलेश लंके नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.