यूपीमध्ये पोलीस भरती पेपर लीक प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठी कारवाई केली आहे. पोलीस भरती मंडळाच्या अध्यक्षा रेणुका मिश्रा यांना पदावरून हटवण्यात आले आहे. तसेच आता रेणुका मिश्रा यांच्या जागी राजीव कृष्णा यांची पोलीस भरती मंडळाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये 60,000 हून अधिक कॉन्स्टेबल भरती पदांसाठी 48 लाखांहून अधिक उमेदवारांनी भाग घेतला होता. पण पेपर फुटल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली. याप्रकरणी आता भरती मंडळाच्या अध्यक्षा रेणुका मिश्रा यांना पदावरून हटवण्यात आले असून राजीव कृष्णा यांच्याकडे भरती मंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातील सर्व 75 जिल्ह्यांमध्ये 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी कॉन्स्टेबल भरतीसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा पेपर फुटला होता. नंतर उत्तर प्रदेश सरकारने ही परीक्षा रद्द केली. तसेच ती परीक्षा पुन्हा सहा महिन्यांत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
याप्रकरणी कारवाई करत यूपी एसटीएफने 2 मार्च रोजी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. एसटीएफने त्यांच्याकडून प्रवेशपत्रे आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. या प्रकरणी विभूतीखंड पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रयागराज येथील अजय सिंग आणि सोनू सिंग यादव यांचा समावेश आहे.
कॉन्स्टेबल भरती परीक्षेत राज्यातील सुमारे 50 लाख तरुणांनी सहभाग घेतला होता. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली. पण पेपरफुटीनंतर परीक्षा रद्द करून सहा महिन्यांत पुन्हा परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे.