शिवसेना ठाकरे गटाचे नेते तपास यंत्रणांच्या चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची आज एसीबी चौकशी होणार आहे. आज दुपारी रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयात राजन साळवी यांची चौकशी होणार आहे. सोमवारी म्हणजेच काल राजन साळवी यांची पत्नी, मुलगा आणि भाऊ यांची एसीबी चौकशी झाली. मुंबई उच्च न्यायालयाने राजन साळवींना अंतरिम दिलासा दिला आहे. तसेच एसीबीला चौकशीसाठी सहकार्य करण्याचे निर्देश देखील दिले आहेत. ठाकरे गटाचे माजी खासदार अनिल देसाई यांना देखील आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलावले आहे.
काल राजन साळवी यांची पत्नी अनुजा साळवी यांची एसीबी चौकशी झाली. एसीबी चौकशी झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्या खूप भावुक झाल्या होत्या. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी काल त्यांची चार तास चौकशी करण्यात आली आहे. अनुजा साळवी यांची चौकशी झाल्यानंतर त्यांना एसीबी कार्यालयातील आरोपींसाठीच्या रजिस्टरवर सही करण्यास सांगितले. त्या रजिस्टरवर सही करताना अनुजा साळवींना खूप वाईट वाटले होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्या खूप भावुक झाल्या होत्या.
जानेवारी महिन्यात एसीबीने राजन साळवी यांच्या रत्नागिरी, राजापूर येथील कार्यालय आणि निवासस्थानावर छापेमारी केली होती. अवैध मालमत्ता असल्याप्रकरणी राजन साळवी हे एसीबी चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत. राजन साळवी हे ठाकरे गटाचे राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. अवैध मालमत्तेप्रकरणी त्यांची आतापर्यंत ७ ते ८ वेळा चौकशी झाली आहे. मात्र कितीही चौकशी केली , अगदी अटक केली तरी मी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही असे राजन साळवी यांनी स्पष्ट केले आहे.