शेहबाज शरीफ हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान झाले आहेत. त्यांनी सोमवारी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. 72 वर्षीय शेहबाज शरीफ यांनी दुसऱ्यांदा देशाची सूत्रे हाती घेतली आहे. राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी राष्ट्रपती भवन ‘ऐवान-ए-सदर’ येथे आयोजित समारंभात शेहबाज यांना पदाची शपथ दिली.
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शेहबाज शरीफ यांची निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी X वर शेहबाज शरीफ यांना अभिनंदनाचा संदेश पाठवला आहे. “पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्याबद्दल शेहबाज शरीफ यांचे अभिनंदन”, असे पंतप्रधान मोदींनी लिहिले आहे.
शेहबाज शरीफ हे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे धाकटे बंधू आहेत. आता ते सलग दुसऱ्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान बनले आहेत. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) चे उमेदवार म्हणून शेहबाज यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. 336 सदस्यांच्या सभागृहात त्यांना 201 मते मिळाली आहेत.
शेहबाज यांचे प्रतिस्पर्धी आणि तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) च्या वतीने उमर अयुब खान यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते. परंतु, त्यांना 336 सदस्यांच्या सभागृहात केवळ 92 मते मिळाली.