▪️कर्मविपाक सिद्धांतानुसार, “ आपण केलेले वाईट कर्म हे वाघाप्रमाणे आपली शिकार करतात. तर आपण केलेले सत्कर्म हे आपलं देवदूताप्रमाणे रक्षण करतात.” म्हणून आपण सत्कर्म करण्याकरिता सदैव तत्पर असावे. आपल्या मनाने, वाचेने, देहाने, बुद्धीने कुठल्याही प्रकारचे कुकर्म होऊ नये याची सर्वस्वी जवाबदारी आपण घेणं गरजेचं आहे.
▪️आपल्याला सगळ्यांना ससा आणि कासवाची गोष्ट माहिती आहे. जंगलात एक ससा असतो आणि एक कासव असते. ससा आणि कासव यांच्यात पळण्याची शर्यत होते. कासव पळू शकत नाही. कासवाची चालण्याची गतीही खूप कमी असते. त्या शर्यतीत ससा कासवापेक्षा खूप वेगाने धावतो. त्यामुळे, ससा खूप थकतो आणि एका झाडाखाली विश्रांती घ्यायचे ठरवतो. तो मागे वळून पाहतो तर त्याला कासव कुठेच दिसत नाही. सशाला खूप आनंद होतो. त्या आनंदाच्या भरात तो एका झाडाखाली झोपतो.
▪️काही वेळाने कासव तिथे येतं. कासव सशाकडे पाहून किंचित हसतं. त्यानंतर, कासव त्याच्या चालीने हळूहळू पुढे चालायला लागतं. बराच वेळानंतर सशाला जाग येते आणि तो पुन्हा मागे वळून पाहतो. त्याला कासव कुठेच दिसत नाही. सशाला वाटतं की कासव अजूनही मागेच आहे. त्या आनंदाच्या भरात ससा वेगाने धावत सुटतो. काही क्षणातच ससा ठरवलेल्या ठिकाणी पोहोचतो आणि पाहतो तर काय ? कासव तेथे आधीपासूनच पोहोचलेले असते. कासवाने शर्यत जिंकलेली असते. ससा शर्यत हरतो आणि खूप दुःखी होतो. ससा कासवाला विचारतो की, “तू शर्यत जिंकला कसा?” कासव सशाला सांगतो की, “ जेव्हा तू गाढ झोपला होतास तेव्हा मी हळूहळू माझ्याकडे ध्येयाकडे चालत होतो.” सशाने कासवाला विचारले की, “ मी झोपलो होतो हे तुला कसे काय माहीत ?” त्यावर कासव म्हणाला की, “ जेव्हा आपण शर्यतीला सुरुवात केली तेव्हाच मला माहित होते की तुला गाढ झोप लागणार आहे. तू ज्या वेगाने धावत होतास त्यामुळे तुला विश्रांतीची गरज आहे हे मी जाणले होते.” सशाला स्वतःची चूक कळली आणि त्याने त्याची कबुली दिली.
▪️या कथेनुसार ससा आणि कासव हे मनुष्यजीवन जगण्याचे प्रतीक आहेत. खूप मोठा गहन अर्थ या कथेमध्ये दडलेला आहे. डोळसपणे जर या कथेकडे पाहिले तर असे लक्षात येईल की मानवी जीवनाच्या कर्माचे रहस्य ही कथा सांगते. ससा म्हणजे मनुष्य जे कर्म करतो ते आणि कासव म्हणजे मनुष्याने केलेल्या कर्माचे प्रारब्ध होय. तर कासवाने जिंकलेली शर्यत म्हणजे मनुष्य जीवनप्रवासाचा निर्णय होय.
▪️कर्माच्या रहस्यानुसार क्रियमाण कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म हे कर्माचे तीन प्रकार आहेत. वर्तमानकाळात जे कर्म मनुष्य करतो ते क्रियमाण कर्म आहे. केलेले क्रियमाण कर्म जेव्हा संचितात परावर्तित होते तेव्हा ते संचित कर्म असतं. तर साठवलेले संचित कर्म म्हणजेच प्रारब्ध कर्म होय.
कर्माचा सिद्धांत हा प्रत्येक मनुष्यास लागू पडतो. देश, स्थिती आणि कालाच्या सर्व मर्यादा ओलांडून जाण्याची सिद्धता कर्माच्या सिद्धांतात आहे. त्यामुळे, पृथ्वीतलावरील प्रत्येक मनुष्याच्या हातात केवळ क्रियमाण कर्म करण्याचाच अधिकार आहे. प्रत्येक व्यक्ती ते क्रियमाण कर्म कसे करते आहे यावरच त्या व्यक्तीचे संचित कर्म तयार होते आणि संचित कर्मानुसारच त्या व्यक्तीला त्याचे प्रारब्ध कर्म भोगावे लागते. प्रारब्धाचे भोग हा शब्दप्रयोग आपण जो वापरतो त्याचे मूळ हे आपल्याला या कर्माच्या रहस्यात सापडते.
▪️कर्मविपाक सिद्धांतानुसार, “ आपण केलेले वाईट कर्म हे वाघाप्रमाणे आपली शिकार करतात. तर आपण केलेले सत्कर्म हे आपलं देवदूताप्रमाणे रक्षण करतात.” म्हणून आपण सत्कर्म करण्याकरिता सदैव तत्पर असावे. आपल्या मनाने, वाचेने, देहाने, बुद्धीने कुठल्याही प्रकारचे कुकर्म होऊ नये याची सर्वस्वी जवाबदारी आपण घेणं गरजेचं आहे.
▪️मनुष्यप्राणी हा स्वतःच्या संपूर्ण आयुष्यात स्वतःच स्वतःचं नेतृत्व करत असतो आणि तो/ती स्वतःचाच उत्तम अनुयायीही असतो. जे पिंडी ते ब्रह्मांडी यानुसार जी व्यक्ती स्वतःचा वर्तमानकाळ उत्तम प्रकारे हाताळू शकते तीच व्यक्ती स्वतःचा भविष्यकाळ सामर्थ्यवान बनवू शकते. प्रपंच असो किंवा परमार्थ असो यात वर्तमान काळातील कृतीला खूप महत्व आहे. कारण, त्यावरच भविष्यातील प्रारब्ध कर्माची फळं अवलंबून असतात. याविषयी श्रीसमर्थ रामदास स्वामी दासबोधात असे म्हणतात की,
“ जैसें जैसें करावें |
तैसें तैसें पावावें |
हे जयास नेणवें |
तो येक मूर्ख || ४१-०१-०२”
याचा अर्थ असा आहे की, जे जे आपण (मनुष्यप्राणी) करतो ते ते आपल्याला भोगावे लागते हे ज्यांना कळत नाही ते मूर्ख आहेत.
जय जय रघुवीर समर्थ|
लेखक:-
माधव श्रीकांत किल्लेदार +९१९९२१६८४२२४
सौजन्य – विश्व संवाद केंद्र,पुणे