देशात लवकरच लोकसभेची निवडणूक होणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकीची तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच या आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणा राज्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींनी संगारेड्डी येथील सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी परिवारवादावरून काँग्रेसवर टीका केली आहे. आज जेव्हा नरेंद्र मोदी तुमच्या आणि तुमच्या परिवाराला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर, काँग्रेस आणि त्यांचे सहकारी मोदी आणि मोदींच्या परिवाराला शिव्या देत आहेत.
तेलंगणा येथील संगारेड्डी येथील सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ”जेव्हा मी परिवारवादाचा विरोध करतो, जेव्हा मी म्हणतो परिवारवाद हे लोकशाहीसाठी घातक आहे. तेव्हा हे काही उत्तर देत नाहीत, तर म्हणतात मोदींना परिवार नाही. ते म्हणतात कुटुंब पहिल्यांदा. मोदी म्हणतो राष्ट्र प्रथम. त्यांच्यासाठी परिवारच सर्वकाही आहे. मात्र हा देशच माझ्यासाठी परिवार आहे. त्यांनी आपल्या कुटुंबाच्या हितासाठी देशहिताचा त्याग केला. मोदींनी देशाच्या कल्याणासाठी स्वतःचे बलिदान दिले आहे. बीआरएस असो की काँग्रेस, दोन्ही एकच पक्ष आहेत. बीआरएस आणि काँग्रेसमध्ये युती आहे की नाही हे तेलंगणातील जनताच सांगेल. पण जगाला माहीत आहे की बीआरएस आणि काँग्रेस यांच्यातील घोटाळ्याचे बंधन खूप मजबूत आहे. घोटाळा बंधन म्हणजे तेलंगणाच्या दरोड्यात दोघेही एकमेकांना कव्हर फायर देतात.”
भारताच्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आज मी तुम्हाला हमी देत आहे की येत्या काही वर्षात आम्ही भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवू. हे आश्वासनही पूर्ण होईल कारण ही मोदीची गॅरंटी आहे. तुम्हाला सांगितले होते की आम्ही मिळून भारताला संपूर्ण जगात एका नव्या उंचीवर नेऊ. आज तुम्ही पाहत आहात की संपूर्ण जगात आशेचा किरण बनून भारत कसा नवीन उंची गाठत आहे. तेलंगणाला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी केंद्र सरकार गेली १० वर्षे अविरतपणे काम करत आहे”, असेही ते म्हणाले.