कोलकाता उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अभिजीत गंगोपाध्याय असे या न्यायमूर्तींचे नाव असून ते मंगळवार, ५ मार्च २०२४ रोजी सकाळी हायकोर्टात पोहोचले आणि त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला.राजीनामा दिल्यानंतर कोलकाता इथं त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले . यावेळी येत्या ७ मार्च रोजी मी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगत पश्चिम बंगालमध्ये सध्याच्या परिस्थितीत केवळ भाजपच तृणमूल काँग्रेसशी लढू शकतो, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता असून त्या पार्श्वभूमीवर देशभरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. राजकीय पक्षांनी प्रचार सुरू केला असून उमेदवार निश्चितीची लगबग सुरू आहे. अशा परिस्थितीत पक्षांतराचे आणि नव्या पक्षप्रवेशाचे वारेही जोरदार वाहत आहेत, कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय हे त्यापैकी एक आहेत.
मी फार कमी वेळात भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.मी इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टीमध्ये सामील होऊ शकलो नाही कारण हा या पक्षाचा पाया घराणेशाही आणि कौटुंबिक जमीनदारीवर आधारित आहे. तर मी आस्तिक आणि धार्मिक असल्यामुळे कम्युनिस्ट पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. सर्व घडामोडी गेल्या सात दिवसांत घडल्या. असून मीही भाजपशी संपर्क साधला, भाजपनेही मला संपर्क केला असल्याचे अभिजीत गंगोपाध्याय यांनी यावेळी सांगितले आहे.
तसेच नोकरी सोडण्याचे कारण म्हणजे त्यांच्या सद्सद्विवेकबुद्धीची हाक असल्याचे सांगत आता ते लोकांच्या कल्याणासाठी काम करतील.असे गंगोपाध्याय म्हणाले आहेत. गंगोपाध्याय बंगालमधील तामलुक मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर लढवतील, अशी अटकळ बांधली जात आहे. तामलूक जागा अलीकडच्या 2009 च्या निवडणुकीपासून सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला आहे.
महत्त्वाचे म्हणजे न्यायमूर्ती अभिजीत गंगोपाध्याय यांनी गेल्या दोन वर्षांत आपल्या आदेशांद्वारे असो किंवा माध्यमांना दिलेल्या मुलाखतींद्वारे असो, राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर आणि त्यांच्या नेत्यांवर जोरदार टीका केलेली पाहायला मिळाली होती.