राज्याला अवकाळी पावसाचा इशारा
मागील काही दिवसांपासून देशासह राज्यात वातावरणात अनेक बदल आपल्याला पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसला असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुणे शहरात देखील काही दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावली होती. तसेच सकाळच्या वेळेस कडक ऊन तर रात्रीच्या आणि पहाटेच्या वेळेस थंडी असे वातावरण पाहायला मिळत होते. काही दिवस कडक उन्हाळा देखील जाणवत होता. मात्र आता उन्हाळ्याच्या झळा सोसल्यावर पुणे शहराच्या तापमानात घट झालेली दिसून येतेय. पुढील दोन ते तीन दिवस हीच स्थिती राहण्याची शक्यता असून, तापमानात घट होण्याची शक्यता आहे. पुढील एक दोन दिवसांत राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आमदार राजन साळवींची एसीबी चौकशी
शिवसेना ठाकरे गटाचे नेते तपास यंत्रणांच्या चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची आज एसीबी चौकशी होणार आहे. आज दुपारी रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयात राजन साळवी यांची चौकशी होणार आहे. सोमवारी म्हणजेच काल राजन साळवी यांची पत्नी, मुलगा आणि भाऊ यांची एसीबी चौकशी झाली. मुंबई उच्च न्यायालयाने राजन साळवींना अंतरिम दिलासा दिला आहे. तसेच एसीबीला चौकशीसाठी सहकार्य करण्याचे निर्देश देखील दिले आहेत. ठाकरे गटाचे माजी खासदार अनिल देसाई यांना देखील आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलावले आहे.
स्मृती इराणींची राहुल गांधींना आव्हान
काल राज्याची उपराजधानी नागपूर येथे नमो युवा महासंमेलन पार पडले. या संमेलनामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्मृती इराणी, तेजस्वी सूर्या , देवेंद्र फडणवीस आणि आमदार खासदार उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी युवांना संबोधित राहुल गांधी, २०१४ पर्यंत केंद्रात असणाऱ्या युपीए सरकारवर टीका केली आहे. तसेच एनडीए आणि युपीए सरकारमधील १० वर्षांमधील कामगिरीबद्दल चर्चा करण्यासाठीचे आव्हान दिले. जागा राहुल गांधी यांनी ठरवावी , भाजपा या चर्चेसाठी आपला एक कार्यकर्ता निवडेल.
उद्या सुरू होणार देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत अनेक क्षेत्रांमध्ये विकास करत आहे. विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करताना दिसत आहे. त्यातीलच एक महत्वाचा भाग म्हणजे दळणवळण. शहरातील वाहतूक सुलभ व्हावी, नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी भारत सरकार सर्वच राज्यांमध्ये मेट्रो प्रकल्प उभारत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ६ मार्च रोजी कोलकाता येथील पहिल्या अंडरवॉटर म्हणजेच पाण्याखालील मेट्रोचे उदघाटन करणार आहेत. ६ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगाल आणि बिहारला भेट देणार आहेत.