काही दिवसांपूर्वी द्रमुक पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ए.राजा यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे ते पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. ए.राजा भाजपाविरुद्ध अधिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. ”भारत एक राष्ट्र नाही , तर ते एक उपखंड आहे हे लक्षात घेतले पाहिजे”, असे ए. राजा म्हणाले होते. तामिळनाडू राज्य भाजपाच्या जय श्री राम आणि भारत माता की जय या घोषणांभोवती फिरणाऱ्या विचारधारेचा स्वीकार करणार नाही. यावर आता भाजपाचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ए.राजा यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
ए. राजा यांच्या वादग्रस्त विधानावर भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी मंगळवारी डीएमकेच्या ए. राजा यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, ” डीएमके नेत्याने भारताच्या विभाजनाच्या आवाहन केले. तसेच प्रभू श्रीरामाचा अपमान केला आहे. तसेच मणिपूरच्या जनतेवर निंदनीय टिपण्णी केली आहे. तसेच एक देश म्हणून भारताच्या विचारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.”
”द्रमुक पक्षातून द्वेषयुक्त विधानांचा रतीब सुरूच आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्म नष्ट करायला हवे असे वादग्रस्त विधान केले होते. आता ए. राजा आहेत जे, भगवान प्रभू श्रीरामावर ते चुकीचे बोलतात, मणिपुरी जनतेवर निंदनीय टिपण्णी करतात आणि एक राष्ट्र म्हणून भारताच्या कल्पनेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो”, असे भाजपाचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ‘एक्स’वर पोस्ट केले.
दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील तेलंगणा येथील सभेतून काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर परिवारवादावरून टीका केली आहे. तेलंगणा येथील संगारेड्डी येथील सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ”जेव्हा मी परिवारवादाचा विरोध करतो, जेव्हा मी म्हणतो परिवारवाद हे लोकशाहीसाठी घातक आहे. तेव्हा हे काही उत्तर देत नाहीत, तर म्हणतात मोदींना परिवार नाही. ते म्हणतात कुटुंब पहिल्यांदा. मोदी म्हणतो राष्ट्र प्रथम. त्यांच्यासाठी परिवारच सर्वकाही आहे. मात्र हा देशच माझ्यासाठी परिवार आहे. त्यांनी आपल्या कुटुंबाच्या हितासाठी देशहिताचा त्याग केला. मोदींनी देशाच्या कल्याणासाठी स्वतःचे बलिदान दिले आहे. बीआरएस असो की काँग्रेस, दोन्ही एकच पक्ष आहेत. बीआरएस आणि काँग्रेसमध्ये युती आहे की नाही हे तेलंगणातील जनताच सांगेल. पण जगाला माहीत आहे की बीआरएस आणि काँग्रेस यांच्यातील घोटाळ्याचे बंधन खूप मजबूत आहे. घोटाळा बंधन म्हणजे तेलंगणाच्या दरोड्यात दोघेही एकमेकांना कव्हर फायर देतात.”