लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह हे जळगाव दौऱ्यावर आहेत. जळगावमध्ये आज सागर पार्कवर भाजप युवासंमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात अमित शाह यांनी युवकांसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
यावेळी अमित शाह म्हणाले की, आगामी निवडणूक ही 2047 च्या विकसित भारतासाठी आहे. ही निवडणूक भाजप आणि मोदींची नाही तर ही तुम्हा युवकांची आहे, ही तरूणांची निवडणूक आहे. तसेच मोदींविरोधात तयार झालेली इंडिया आघाडी ही कमजोर आहे. कारण घराणेशाही पुढे नेणारा पक्ष देशाचा विकास कधीच करू शकत नाही.
इंडिया आघाडी फक्त त्यांच्या मुला मुलींना सत्तेत बसवण्यासाठी आहे. सोनिया गांधी यांना राहुल गांधींना पंतप्रधान करायचे आहे. शरद पवार यांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री बनवायचे आहे. उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचे आहे. तर ममता बॅनर्जींना त्यांच्या भाच्याला मुख्यमंत्री करायचे आहे. यामध्ये तुमच्यासाठी कोणीच नाही. पण तुमच्यासाठी मोदी आहेत. विकसीत भारताचे लक्ष मोदींनी ठेवले आहे. मोदींनी 10 वर्ष भारताला सुरक्षित ठेवण्याचे काम केले आहे, असे अमित शाह म्हणाले.
पुढे अमित शाह यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. नरेंद्र मोदी यांनी देशाला सुरक्षित आणि समृद्ध करण्याचे काम केले आहे. जर तुम्ही मोदींना पुन्हा संधी दिली तर आपली अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाईल. मी शरद पवारांना विचारतो, पवारसाहेब मोदींना दहा वर्षे झाली पण तुम्हाला महाराष्ट्राची जनता 50 वर्ष सहन करत आहे. तुम्ही 50 वर्ष सोडा जनतेला 5 वर्षांचा हिशोब द्या. मी तर दहा वर्षांचा हिशोब द्यायला तयार आहे, असे अमित शाह म्हणाले.