भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरू आहे. भारताने आधीच ही मालिका आपल्या खिशात घातली आहे. भारताने चौथा कसोटी सामना जिंकत ३-१ अशी या मालिकेत आघाडी घेतली आहे. आता या मालिकेतील शेवटचा सामना हा उद्यापासून म्हणजे गुरूवारपासून सुरु होणार आहे. इंग्लंडला आधीच्या तीन सामन्यांत दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे. आता इंग्लंड संघ किमान शेवट तरी गोड व्हावा यासाठी हा सामना जिंकण्याचे प्रयत्न करणार आहेत.
इंग्लंडने हैद्राबाद येथील सामन्यात भारताचा पराभव करत मालिकेत चांगली सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर भारताने इंग्लडला विजयाची संधी दिली नाही. यशस्वी जैस्वाल या युवा फलंदाजाने तर या मालिकेत जबरदस्त कामगिरी केली आहे. पहिला सामना हरल्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने सलग तीन सामन्यांमध्ये विजय प्राप्त केला आहे. आता टीम इंडिया विजयी चौकार मारण्यासाठी मैदानात उतरणार आहे. सलग तीन सामन्यांमध्ये विजय मिळवल्याने भारतीय संघ आत्मविश्वासाने या सामन्यात खेळेल.
सात मार्च म्हणजे उद्यापासून धरमशाला या मैदानावर भारत इंग्लंड यांच्यातील ५ वा कसोटी सामना सुरु होणार आहे. हा सामना जिंकून विजयी चौकार मारण्याचा प्रयत्न भारत नक्कीच करेल. जसप्रीत बुमराह यांचे कमबॅक झाल्यामुळे भारताची गोलंदाजी मजबूत झाली आहे. भारत इंग्लंड यांच्यातील अखेरचा सामना हा उद्या सकाळी ९.३० वाजता सुरु होणार आहे.