देशात एप्रिल मे महिन्यात लोकसभेची निवडणूक होणार आहे. मार्च महिन्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांमध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. देशभरात भाजपाने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. तसेच उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्र हे सर्वात जास्त लोकसभेच्या जागा देणारे राज्य आहे. महाराष्ट्रामध्ये ४८ लोकसभा मतदारसंघ आहे. महायुतीने राज्यात ४५ प्लस हे लक्ष्य ठेवले आहे. लोकसभेत ४५ पेक्षा जास्त जिंकण्याचे उद्दिष्ट महायुतीने ठेवले आहे. भाजपाने २३ जागांवर आपले निरीक्षक नियुक्त केले आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मुरलीधर मोहोळ आणि जगदीश मुळीक या दोघांची नवे उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. दरम्यान मुरलीधर मोहोळ यांचा जनसंपर्क अतिशय दांडगा आहे. त्यांनी केलेल्या कार्यामुळे उमेदवारी मुरलीधर मोहोळ यांना मिळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भाजपाकडून पुणे लोकसभा मतदारसंघासाठी पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. भाजपाने मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवल्यामुळे जगदीश मुळीक यांना लोकसभा उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. मात्र सध्या जनतेचे मत आणि मोहोळ यांचा जनसंपर्क किंवा काम पाहता त्यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. सध्या मुरलीधर मोहोळ हे पुणे लोकसभेचे निवडणूक प्रमुख आहेत.
मुरलीधर मोहोळ यांचा पुणे शहर व आजूबाजूच्या भागांमध्ये दांडगा जनसंपर्क आहे. कसबा विधानसभा निवडणुकीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या दौऱ्यावेळी देखील नियोजनामध्ये मुरलीधर मोहोळ हे आघाडीवर होते. जेव्हा जेव्हा पुण्यातील कार्यक्रमांना देवेंद्र फडणवीस उपस्थित असतात तेव्हा ते कायमच मुरलीधर मोहोळ यांचे कौतुक करताना दिसून येतात. तसेच मुरलीधर मोहोळ हे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे महापौर होते. तसेच ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. सध्या त्यांच्याकडे पुणे लोकसभेचे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी आहे. त्यामुळे जेव्हा भाजपाकडून उमेदवारांची यादी जाहीर होईल त्यात मुरलीधर मोहोळ यांचे नाव असणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.