नुकताच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिहारमधील कटिहार येथे आज सकाळी (6 मार्च) भाजप आमदार कविता पासवान यांचा पुतण्या नीरज पासवान यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. काही अज्ञातांनी नीरज पासवान यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली आहे. या घटनेनंतर बिहारमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
नीरज पासवान हे आज सकाळी ड्रायव्हर टोला येथील घराजवळ उभे होते. त्यावेळी अचानक दुचाकीवरून आलेल्या काही अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात नीरज पासवान यांना 6 गोळ्या लागल्या होत्या. त्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. मात्र, तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे प्रमुख सुमन कुमार सिंग, एएसपी शशी शंकर कुमार हे घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी छापा टाकून एका आरोपीला अटक केली आहे. तसेच या आरोपीकडून शस्त्रे जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सध्या पोलिसांनी नीरज पासवान यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमार्टमची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, सध्या पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत.