पश्चिम बंगालमधील संदेशाखाली येथील महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण घडले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी शाहजहान शेखला कोलकाता हाय कोर्टाच्या सूचनेनुसार अटक केली आहे. तसेच काल हायकोर्टाने शाहजहान शेख यांची केस व प्रकरणातील सर्व कागदपत्रे सीबीआयकडे सोपवावीत असे आदेश दिले आहेत. ईडी अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याशी संबंधित संदेशाखाली प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयाला पश्चिम बंगाल सरकारने बुधवारी सुप्रीम कोर्टात आव्हान देत तातडीची सुनावणी घेण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने वकिलांना सरन्यायाधीशांकडे जाण्यास सांगितले, कारण ते दाखल झालेल्या याचिकेवर आदेश देतील. काल पश्चिम बंगाल सरकारने कोलकाता हाय कोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. ज्यामध्ये संदेशाखाली प्रकरणात सीबीआयकडे तपास सोपवावा असे आदेश हायकोर्टाने दिले होते. हे प्रकरण ईडी अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याशी संबंधित आहे.
जानेवारी महिन्यात ईडीच्या अधिकाऱ्यांवर उत्तर २४ परगणा जिल्ह्यात रेशन घोटाळ्याप्रकरणी बोनगाव नगरपालिकेचे माजी अध्यक्ष शंकर आध्ये आणि तृणमूल काँग्रेसचे नेते शेख शाहजहान यांच्या घरांवर छापे टाकण्यासाठी जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला होता. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी याचिकेचा उल्लेख केला.
तत्पूर्वी, कोलकाता उच्च न्यायालयाने ईडी अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याशी संबंधित संदेशाखाली प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित केले. काही आठवड्यांनंतर कोणतीही कारवाई न होता, २९ फेब्रुवारी रोजी तृणमूल काँग्रेस (TMC) नेते शाहजहान शेख पश्चिम बंगाल पोलिसांनी अटक केली होती, त्यानंतर पश्चिम बंगालच्या बसीरहाट न्यायालयाने त्याला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.