आज (6 मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाच दिवसांतील दुसरा पश्चिम बंगाल दौरा पार पडला. तर पंतप्रधान मोदींनी आज कोलकाता येथे 15,400 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. मंगळवारी (5 मार्च) ते कोलकाता येथे पोहोचले.
पंतप्रधान मोदींनी आज कोलकाता येथे देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचे उद्घाटन केले. यानंतर त्यांनी शाळकरी मुलांसोबत मेट्रोमध्ये बसून प्रवास केला. मेट्रोमध्ये त्यांनी अनेक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याशिवाय ट्रेनमध्ये प्रवास करताना पंतप्रधान मोदींनी मेट्रो कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला.
यावेळी जेव्हा पंतप्रधान मोदी उद्घाटनासाठी पोहोचले तेव्हा त्यांना पाहण्यासाठी हजारो लोकांची गर्दी झाली होती. तेथे मोठ्या संख्येने लोकांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी लोकांनी ‘मोदी-मोदी’ आणि ‘जय श्री राम’ अशा घोषणा दिल्या.
पीएम मोदींच्या स्वागतासाठी जमलेली गर्दी पाहून मोदींचा प्रभाव किती आहे हे दिसून येत होते. विशेष म्हणजे ममता बॅनर्जींचा बालेकिल्ला असलेल्या बंगालमध्ये पीएम मोदींची जादू लोकांवर प्रभाव टाकत असल्याचे चित्र आज पाहायला मिळाले.
दरम्यान, कोलकाता येथे पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी थेट दक्षिण कोलकाता येथील शिशु मंगल हॉस्पिटल गाठले, जिथे गेल्या अनेक दिवसांपासून रामकृष्ण मिशन आणि मठाचे अध्यक्ष स्वामी स्मरानंद जी महाराज दाखल आहेत.