पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधानांनी उत्तर २४ परगाना जिल्ह्यातील बशीरहाटमध्ये एका सभेला संबोधित केले. सध्या चर्चेत असलेले संदेशाखाली हे ठिकाणही याच जिल्ह्यात आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संदेशखाली येथे तृणमूल काँग्रेसचा निलंबित नेता शाहजहान शेख याच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करणाऱ्या महिलांची भेट घेतली.
या पीडित महिला पंतप्रधानांना आपली व्यथा सांगताना भावूक झाल्या, पंतप्रधानांनी त्यांचे कथन “वडिलांप्रमाणे” संयमाने ऐकले आणि त्यांच्या वेदना समजून घ्यायचा प्रयत्न केला.अशी माहिती भाजपच्या नेत्या अग्निमित्रा पॉल यांनी दिली आहे.
बारासात येथील रॅलीपूर्वी पंतप्रधान मोदींनी संदेशखाली वरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर जोरदार निशाणा साधला होता. संदेशखाली येथे जे काही घडले ते शरमेचे आहे. टीएमसी सरकार यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीला संरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे. तथापि, त्यांना उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाकडून झटका मिळाला आहे. आता थोड्याच दिवसात संदेशखालीचे वादळ पश्चिम बंगालच्या प्रत्येक भागात पोहोचेल,आणि ही जागृत नारी शक्ती’ (स्त्री शक्ती) राज्यातील सत्ताधारी टीएमसीचा नाश करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.” असे पंतप्रधान म्हणाले आहेत.
उत्तर 24 परगणा मधील संदेशखाली हे गाव तृणमूल काँग्रेसचे स्थानिक नेता शाहजहान शेख आणि त्याच्या साथीदारांवर अनेक महिलांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. संदेशखाली इथल्या मागासवर्गीय महिलांच्या जमिनी त्यांना धमकावून लैंगिक अत्याचार करुन बळकावण्यात आल्या असल्याचा आरोपही ह्यावेळी करण्यात आला होता. गेल्या चार वर्षांपूर्वीपासून वारंवार हा प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, या घटनेतील प्रमुख आरोपी तृणमूल काँग्रेसचा बाहुबली नेता शाहजहान शेख याला पश्चिम बंगाल पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली. २४ परगना जिल्ह्यातील मिनाखन परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले होते.तब्बल ५५ दिवस फरार झाल्यानंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. आता शाहजहान शेख सध्या सीबीआयच्या ताब्यात असून सीबीआयने त्याच्यावर तीन गुन्हे दाखल केले आहेत.