पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान मोदींनी 15,400 कोटी रुपयांच्या अनेक कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. तसेच देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचे आणि पुण्यातील रुबी हॉल ते रामवाडी या मेट्रो मार्गिकेचे लोकार्पण केले आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर २४ परगणा येथील बरसत येथे एका सभेला संबोधित केले. यावेळी संदेशाखाली प्रकरणावरून पंतप्रधान मोदींनी ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार टीका केली आहे. टीएमसी सरकार हे महिलाविरोधी असून ते बहिणी आणि मुलींना सुरक्षा देऊ शकत नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बरसत येथील सभेला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ”टीएमसी सरकार हे महिलाविरोधी असून ते बहिणी आणि मुलींना सुरक्षा देऊ शकत नाही. TMC गुन्हेगारांना संरक्षण देण्यात व्यस्त आहे. या सरकारच्या काळात राज्यात महिला शक्तीवर अत्याचार होत आहेत. टीएमसीच्या राजवटीत सर्वत्र अत्याचार होत आहेत. पश्चिम बंगालमध्ये महिला संतप्त आहेत. संदेशखालीपासून सुरू झालेले वादळ केवळ तेवढ्यापुरतेच मर्यादित राहणार नाही तर पश्चिम बंगालच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल.बंगाल सरकार एका “गुन्हेगाराला” वाचवण्यासाठी आपली सर्व शक्ती वापरत आहे.”
अब की बार ४०० पार
केंद्र सरकारचे कामी पाहून पश्चिम बंगाल आणि पूर्ण देश म्हणत आहे की अब की बार एनडीए सरकार ४०० पार असे पंतप्रधान मोदी म्हणाले. संपूर्ण देश हा भाजपाचा परिवार आहे असे मोदी म्हणाले. हा विशाल कार्यक्रम भाजप महिला शक्तीला विकसित भारताची शक्ती कशी बनवत आहे याचा साक्षीदार आहे. पंतप्रधान म्हणाले की, ९ जानेवारी रोजी भाजपने देशात ‘नारीशक्ती वंदन अभियान’ सुरू केले होते, ज्या दरम्यान देशभरात लाखो बचत गटांशी संवाद साधण्यात आला होता. आज पश्चिम बंगालमध्ये स्वयं-सहायता गटांशी संबंधित भगिनींची अशी मोठी परिषद होत आहे.