1925 साली प. पू . डॉक्टर हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली हे आपल्याला माहित आहेच. 1925 ते 1940 च्या दरम्यान संघाची कार्यपद्धती विकसित होत गेली परमपूज्य डॉक्टर हेडगेवार यांच्या इच्छेनुसार त्यांच्या निधनानंतर 1940 साली प. पू . श्री गुरुजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक झाले.
परमपूज्य माधवराव गोळवलकर गुरुजी यांचा जन्म माघ महिन्यातील विजया एकादशीला 1906 मध्ये झाला. त्या दिवशी इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे 19 फेब्रुवारी ही तारीख होती, परंतु विजया एकादशीलाच त्यांचा जन्मदिन आपण मानतो. त्यानिमित्तानं आज जर गुरुजींबद्दल बोलायचं तर मी काय बोलू ? मला उमगलेले, समजलेले म्हणायचं तर मला त्यांचा सहवास कधीच मिळाला नाही. मी पाहिलेले तर म्हणू शकत नाही कारण मी कधीच त्यांना प्रत्यक्ष पाहिलं नाही . त्यांचे चरित्र, त्यांची जीवनपद्धती वाचताना मला भावलेले गुरुजी असे मात्र मला म्हणता येईल. त्यांच्याबद्दल अनेकांनी आठवणी लिहिल्या आहेत. ज्या अत्यंत प्रेरणादायी आहेत.
पूजनीय गुरुजींचे जीवन म्हणजे एक तेजस्वी यज्ञ होता. राष्ट्राय स्वाहा I इदम राष्ट्राय I इदम न मम I या भावनेने हा यज्ञ चालू होता. बुद्धी आणि शरीर अक्षरशः तीळ तीळ झिजवून शेवटी स्वतःचे शरीरच समिधा म्हणून समर्पण करून या यज्ञाची अपूर्व सांगता त्यांनी केली.
स्वतःच्या हस्ताक्षरात लिहीलेली पत्र, अंगात ताप असताना सुद्धा व्यथा न दाखवता त्यांनी दिलेली बौद्धिकं , घेतलेल्या बैठका, हे सगळं खरंतर अलौकिक होतं. सर्वसामान्यात मिळून मिसळून वागणारा हा पुरुष आध्यात्मिक क्षेत्रात मोठा अधिकारी होता याची कल्पना त्यांच्या निकट राहणाऱ्यांना सुद्धा करता येत नसेल. काशी येथील विश्वविद्यालयाची एम. एस् सी पदवी त्यांनी प्राणिशास्त्रात घेतली होती. प्रथम श्रेणीने पास झाल्यावर चेन्नईला मत्स्य जीवनावर संशोधन करण्यासाठी ते गेले पण आर्थिक अडचणींमुळे ते पूर्ण करू शकले नाहीत. पुढे नागपूरला परत येऊन वकिली शिक्षण त्यांनी घेतले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते काम करायला लागले. अध्यात्माच्या आवडीने खरंतर ते रामकृष्ण मिशनमध्ये दाखल झाले.
स्वामी रामकृष्ण परमहंसांचे शिष्य आणि स्वामी विवेकानंदांचे गुरुबंधू स्वामी अखंडानंद यांच्याकडून त्यांनी सारगाछी येथे दीक्षा घेतली आणि आपल्या गुरुदेवांची गुरुजींनी मनोभावे सेवा केली. अखंडानंदांचाच आदेश घेऊन गुरुजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करायला निघाले. आपल्या गुरु कडून प्राप्त झालेल्या कृपा प्रसाद रुपी कमांडलूतून, मंत्रपूत पवित्र जलानं त्यांनी हिंदू मनावर, समाजावर अमृतमय सिंचन केलं आहे. स्वामी विवेकानंदांचं कन्याकुमारीचं भव्य शिल्प त्यांच्या प्रेरणेतूनच निर्माण झाले आहे. तसेच विश्व हिंदूंची स्थापना ही गुरुजींच्या विविध संप्रदाय आणि पंथ यांच्या एकसंध करण्याच्या प्रयत्नातून झाली आहे.
आपल्या जीवनातून संघ दुसऱ्यामध्ये संक्रमित करण्याचे जे संघ कार्यकर्त्यांचे कौशल्य आहे त्याची गंगोत्री म्हणजे परमपूज्य डॉक्टर हेडगेवार यांचे जीवन आणि त्याचा विस्तारित प्रवाह म्हणजेच गुरुजींचं जीवन असं आपल्याला म्हणावं लागेल.
सविता लळीत सोलापूर.
संदर्भ -गुरुजींचे जीवन चरित्र – विवेक
सौजन्य -समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत