शुक्रवार 8 मार्च महाशिवरात्रीनिमित्त त्रंबकेश्वर मंदिर 24 तास खुले राहणार आहे. महाशिवरात्री निमित्त श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे नियोजन करण्यात आले आहे. ट्रस्ट मंदिराचे अध्यक्ष न्यायाधीश नितीन जीवने यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी सुरू असल्याची माहिती विश्वस्त मंडळाकडून देण्यात आली.
महाशिवरात्री निमित्त श्री त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंगाचे मंदिर शुक्रवार, ८ रोजी पहाटे ४ वाजेपासून शनिवार, ९ रोजी रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना दर्शनार्थ खुले राहील. भाविकांची श्री त्र्यंबक राजांच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता, कोणतीही अप्रिय घटना घडू नये याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांकरिता गर्भगृह दर्शन बंद ठेवण्यात आलेले आहे.
महाशिवरात्रीला दुपारी 3 ते 5 या वेळेत श्री त्र्यंबकराजांची पालखी मंदिरातुन निघून नियोजित मार्गानुसार तिर्थराज कुशावर्त येथे देवाला अभिषेक घालून मंदिरात परतेल. महाशिवरात्री निमित्त दरवर्षी प्रमाणे भगवान श्री त्र्यंबकराजांची विशेष महापूजा व पालखी सोहळा रात्री ११:०० ते मध्यरात्री ०२:३० या वेळेत होणार आहे.
श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे मंदिराला आकर्षक विद्युत रोशनाई करणेत आली आहे. तसेच मंदिराचे गर्भगृह, सभामंडप, प्रवेशद्वार उत्तर आणि पूर्व महाद्वार, इ. ठिकाणी फूलांची सजावट होत आहे. येणाऱ्या भाविकांची सोय ही नुकत्याच बांधण्यात आलेल्या भव्य दर्शन मंडपातून व त्याच्या दोन्ही विंग मधून करण्यात येणार आहे.
तातडीने दर्शन घेऊ इच्छीणाऱ्या भाविकांसाठी देणगी दर्शन सुरु राहणार आहे. देणगी दर्शनासाठी आलेल्या भाविकांकरिता सर्व सुविधांनी युक्त भव्य दर्शन मंडप बनविण्यात आलेला आहे.
दोन दिवसांकरीता सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्यामध्ये दि०७ मार्च रोजी संध्याकाळी 7ते 9 या वेळेत प्रसिद्ध गायक श्री. प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन यांचा संगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. दि.०९ रोजी सायंकाळी ओम नटराज अॅकडमी तर्फे कथ्थक नृत्य, दिग्दर्शन मयुरी बेडककर यांचे आहे.या मंदिराच्या पटांगणात कार्यक्रम होइल.
तसेच श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट महाशिवरात्रीला श्री त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंगावर लघुरुद्र अभिषेक सायंकाळी पाच वाजता करण्यात येणार आहे .महाशिवरात्रीला शंकराला बेल वाहणे दुधाचा अभिषेक करणे उसाचा रस वाहने आंब्याचा मोहर वाहणे पूजा करणे यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.महिला सुहासिनी महाशिवरात्र वाती मंदिरात लावतात.