कर्नाटकातील बंगळुरू येथील रामेश्वरम कॅफे स्फोटाची माहिती देणाऱ्यास एनआयएने 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. या स्फोटात कॅफेमध्ये बसलेले 10 लोक गंभीर जखमी झाले होते. एनआयएने आरोपीचे स्केच तयार केले असून त्याचे पोस्टर्सही जारी केले आहे. वाँटेडच्या पोस्टरसोबतच त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्यास 10 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे एनआयएने जाहीर केले आहे. याशिवाय, माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळखही उघड होणार नाही.
हा स्फोट आयएसआयएसने घडवल्याचा संशय असून याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी केंद्रीय गुन्हे शाखा आणि एनआयए दोन्ही तपासात गुंतले आहेत. मंगळवारी गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर एनआयएने या प्रकरणाची सूत्रे स्वीकारली आहे. यापूर्वी, कर्नाटक सरकारने या प्रकरणाचा तपास केंद्रीय एजन्सीकडे सोपवला नव्हता. याप्रकरणी कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी शहर पोलीस तपास करत असल्याचे सांगितले आहे. ते लवकरच याप्रकरणाचा खुलासा करणार आहेत. याप्रकरणाचा तपास वेगाने सुरु आहे. स्फोटानंतर रामेश्वरम कॅफे बंद असून आता ते 8 मार्चलाच उघडणार आहे.
दुसरीकडे, 1 मार्च रोजी लंच दरम्यान बंगळुरुच्या या प्रसिद्ध कॅफेमध्ये स्फोट झाला होता. या स्फोटात 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, जीवीतहानी झाली नाही. याप्रकरणाचा तपास पुढे जात असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्फोटाच्या तासाभरापूर्वी एक संशयित तरुण कॅफेमध्ये आल्याचे समोर आले. तो तिथे काही मिनिटे थांबला आणि नंतर एक बॅग ठेवून निघून गेला. ज्या बॅगेत टायमर लावला होता. त्या बॅगेत आयईडी होता.
आरोपीने कॅफेमध्ये इडलीची प्लेट मागवली होती, पण प्लेट तयार होण्यापूर्वीच तो निघून गेला होता.तसेच, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एजन्सीने त्याचे स्केच तयार केले असून त्याचे पोस्टर प्रसिद्ध करण्यात आले आहे. आरोपीचे वय 30 ते 40 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे. सीसीटीव्ही तपासल्यावर तोच व्यक्ती काही वेळापूर्वी मास्क घातलेला दिसतो. पण एनआयएने जारी केलेल्या स्केचमध्ये त्याचा पूर्ण चेहरा दिसत आहे.