सध्या वेब डिस्टर्बन्समुळे देशासह राज्यातील वातावरण बदलताना पाहायला मिळत आहे. कधी कडक उन्हाळा, तर कधी कडाक्याची थंडी असे आधी वातावरणात बदल पाहायला मिळत होते. गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा फटका बसताना दिसत आहे. आतापर्यंत अवकाळीपावसामुळे देशभरात १२ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. आजही देशात पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. काश्मीर आणि इतर काही राज्यांमध्ये जोरदार बर्फवृष्टी आणि जोरदार वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये आज पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. तसेच पुढील २४ तासांमध्ये देशाच्या विविध भागांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तसेच आज राज्यात देखील पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, राज्यावर अवकाळी पावसाचे संकट अजूनही कायम असल्याचे सांगण्यात येत आहे. पुढील २४ तासांमध्ये हिंगोली,परभणी आणि बीड, अमरावती या ठिकाणी हलका ते माध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात कमालीची घट झाली आहे. दिल्ली, आणि राज्यातही काही ठिकाणी गारवा वाढला आहे. दिल्ली, उत्तर प्रदेशमध्ये पावसाची शक्यता नसल्याचे दिसून येत आहे. जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचलर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.