देशात लवकरच लोकसभेची निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोग कधीही निवडणुकांच्या तारखांची घोषणा करू शकते. तसेच लवकरच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधकांनी निवडणूक जिंकण्यासाठी तयारी सुरु केली आहे. तसेच आता मतदारसंघामध्ये पक्षाच्या नेत्यांच्या प्रचारसभा देखील पार पडतील. यामध्ये प्रत्येक पक्षाचे स्टार प्रचारक हे विरोधी पक्षांवर, नेत्यांवर टीका आणि आरोप करताना दिसून येतील. दरम्यान निवडणूक आयोगाने काँग्रेस खासदार राहुल गांधीना एक ॲडव्हायजरी जारी केली आहे. हे नेमके काय प्रकरण आहे ते जाणून घेऊयात.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, भाषण करताना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच निवडणूक आयोगाने जारी केलेल्या नियमांचे पालन करण्यास यात सांगण्यात आले आहे. दिल्ली हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार आणि पंतप्रधानांविरुद्ध केलेल्या वक्तव्यानंतर ही ॲडव्हायजरी राहुल गांधींना जारी करण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी प्रचार सभेदरम्यान पंतप्रधानांचा उल्लेख ‘पनौती’ आणि ‘पिकपॉकेट’ असा केला होता. या शब्दांवर आक्षेप घेत भाजपाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये निवडणूक आयोगाने राहुल गांधींना नोटीस दिली होती. त्यानंतर आता ही ॲडव्हायजरी जारी करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी भारतात क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा पार पडली होती. तेव्हा भारत अंतिम सामन्यात पोहोचला होता. या सामन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. मात्र सगळे सामने जिंकून मोदी अंतिम सामन्यात गेल्याने भारत हरला असे म्हणत पंतप्रधान मोदी म्हणजे ‘पनौती पंतप्रधान’ असा उल्लेख राहुल गांधींनी केला होता. त्यानंतर भाजपाने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दिल्ली हायकोर्टाच्या आदेशानुसार, निवडणूक आयोगाने ॲडव्हायजरी जारी केली आहे.