पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबुधाबी, UAE मधील भव्य बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था (BAPS) मंदिर या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन केले. त्यांनी मंदिरात पूजा करून आरती केली. बसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. अबुधाबीतील पहिले हिंदू मंदिर म्हणून, BAPS मंदिर हे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्वाचे केंद्रबिंदू बनले आहे, जगाच्या विविध कानाकोपऱ्यांमधून भक्तांना आकर्षित करत आहे. आता या मंदिरात भाविकांना प्रवेश करण्यासाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. याबाबत काही मार्गदर्शक तत्वे लागू करण्यात आली आहे.
१४ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबूधाबीमध्ये हिंदू मंदिराचे लोकार्पण केले. त्यानंतर १५ ते २९ फेब्रुवारी दरम्यान आधीच नोंदणी केलेल्या भाविकांनाच दर्शन घेण्याची परवानगी देण्यात आली होती. १ मार्चपासून हे मंदिर सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे. BAPS मंदिर सोमवार सोडून ९ ते रात्री ८ या वेळेत भाविकांसाठी खुले राहणार आहे. मंदिरात जाण्यासाठी नोंदणीची गरज नाही. मात्र आता भाविकांना काही नियमांचे पालन करावे लागणार आहे.
BAPS मंदिरात सर्व धर्मियांच्या आणि पंथीयांच्या लोकांना प्रवेश असणार आहे. मात्र मंदिरात प्रवेश करताना ड्रेस कोड असणे आवश्यक आहे. मंदिरात येताना खांदे आणि गुडघे झाकणारे कपडे परिधान करावेत असा सल्ला देण्यात आला आहे. कपड्यांवर आक्षेपार्ह काही मजकूर नसावा. मंदिर परिसराचे पावित्र्य राखणारे वस्त्र परिधान करावेत असा सल्ला देण्यात आला आहे. 108 फूट उंच उभे असलेले, BAPS हिंदू मंदिर हे केवळ आध्यात्मिक भक्तीचे प्रतीकच नाही तर अभियांत्रिकी आणि कारागिरीचा चमत्कार देखील आहे. 2017 मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सांस्कृतिक एकतेचे प्रतीक असलेल्या या मंदिराची कोनशिला व पायाभरणी करण्यात आली होती.