विदर्भ आणि ‘या’ ठिकाणी अवकाळी पावसाचे ढग कायम
सध्या वेब डिस्टर्बन्समुळे देशासह राज्यातील वातावरण बदलताना पाहायला मिळत आहे. कधी कडक उन्हाळा, तर कधी कडाक्याची थंडी असे आधी वातावरणात बदल पाहायला मिळत होते. गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा फटका बसताना दिसत आहे. आतापर्यंत अवकाळीपावसामुळे देशभरात १२ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. आजही देशात पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. काश्मीर आणि इतर काही राज्यांमध्ये जोरदार बर्फवृष्टी आणि जोरदार वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर जम्मू काश्मीर, जिमचाल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये जोरदार बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना दणका
देशात लवकरच लोकसभेची निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोग कधीही निवडणुकांच्या तारखांची घोषणा करू शकते. तसेच लवकरच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधकांनी निवडणूक जिंकण्यासाठी तयारी सुरु केली आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने काँग्रेस खासदार राहुल गांधीना एक ॲडव्हायजरी जारी केली आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, भाषण करताना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच निवडणूक आयोगाने जारी केलेल्या नियमांचे पालन करण्यास यात सांगण्यात आले आहे. दिल्ली हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार आणि पंतप्रधानांविरुद्ध केलेल्या वक्तव्यानंतर ही ॲडव्हायजरी राहुल गांधींना जारी करण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी प्रचार सभेदरम्यान पंतप्रधानांचा उल्लेख ‘पनौती’ आणि ‘पिकपॉकेट’ असा केला होता. या शब्दांवर आक्षेप घेत भाजपाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये निवडणूक आयोगाने राहुल गांधींना नोटीस दिली होती. त्यानंतर आता ही ॲडव्हायजरी जारी करण्यात आली आहे.
आजपासून IND Vs ENG कसोटी सामन्याला सुरूवात
आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील अखेरचा कसोटी सामना सुरु होणार आहे. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील हा शेवटचा कसोटी सामना असणार आहे. आजपासून सुरू होणारा सामना हा धरमशाला येथे खेळला जाणार आहे. भारताने याआधीच ३-१ असे सामने जिंकून मालिका आपल्या खिशात टाकली आहे. तर आहे सामना जिंकून विजयी चौकार मारण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. तर किमान शेवटचा सामना जिंकून या मालिकेचा शेवट गोड करावा यासाठी टीम इंग्लंड सज्ज झाली आहे. अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय संघात बदल निश्चित समजला जात आहे. कारण जसप्रीत बुमराह भारतीय संघात परतला आहे.
कलम ३७० हटविल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पहिला जम्मू-काश्मीर दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अनेक राज्यांचे दौरे करत आहेत. प्रत्येक राज्यात हजारो कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण आणि उदघाटन ते करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. कलम ३७० हटविल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जम्मू-काश्मीर दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीनगरमध्ये हजारो कोटींच्या विकासकामांचे उदघाटन आणि लोकार्पण करणार आहेत. एका अधिकृत निवेदनानुसार, पंतप्रधान मोदी श्रीनगरमधील बक्षी स्टेडियममध्ये ‘डेव्हलप इंडिया, डेव्हलप जम्मू आणि काश्मीर’ कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि केंद्रशासित प्रदेशातील कृषी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सुमारे ५,००० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन करतील.