पश्चिम आशियाई देश सीरियामध्ये दहशतवाद्यांनी ग्रामीण भागामध्ये गोळीबार सुरू केला आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यात 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आहे. तसेच मृतांचा आकडा वाढू शकतो. या हल्ल्यात 16 जण जखमी झाले आहेत. तर या हल्ल्यानंतर 50 लोक बेपत्ता झाले आहेत. पूर्व सीरियामध्ये दहशतवाद्यांनी फळे गोळा (ट्रफल्स) करणाऱ्या गावकऱ्यांवर गोळीबार केला.
मिळालेल्या माहितीनुसार, इस्लामिक स्टेट ISIS च्या दहशतवाद्यांनी बुधवारी पूर्व सीरियामध्ये ट्रफल्स गोळा करणाऱ्या गावकऱ्यांवर हल्ला केला. गावकरी गोळा करत असलेले ट्रफल्स हे मोसमी फळ असून ते चढ्या दराने विकले जाते. सीरियातील बरेच लोक ते गोळा करण्यासाठी बाहेर पडतात, कारण येथील 90 टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली आहे.
या घटनेबाबत ब्रिटनस्थित सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्सने सांगितले की, या हल्ल्यात सुमारे 50 लोक बेपत्ता आहेत. आयएसच्या दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण केले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. वेधशाळेने सांगितले की, मृतांमध्ये सरकार समर्थक राष्ट्रीय संरक्षण दलाच्या चार सदस्यांचाही समावेश आहे.
सरकारी मीडिया हाऊस दामा पोस्टनुसार, मृतांची संख्या 44 असल्याचे सांगण्यात येत आहे. दामा पोस्टनुसार, इस्लामिक स्टेट गटाने केलेला हा आतापर्यंतचा सर्वात घातक हल्ला आहे. इराकच्या सीमेला लागून असलेल्या देर अल-झोर या पूर्व प्रांतातील कोबाजेब शहराजवळील वाळवंटी भागात हा हल्ला झाला.
हा देश गरिबीच्या वाईट टप्प्यातून जात आहे. एवढेच नाही तर तेथे दहशतवादाचा मोठा फटका बसत आहे. येथील लढवय्यांवर अमेरिकन आणि इस्रायली हल्ले अलीकडच्या काळात अनेकदा होत आहेत. दहशतवाद आणि गरिबीशी झुंजणाऱ्या या देशाची स्थिती अत्यंत दयनीय आहे. येथील 90 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या अत्यंत गरिबीत जगत आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या भूकंपाने या देशाचे सामान्य जीवन आणि अर्थव्यवस्था आणखी हादरवून सोडली होती, ज्यातून देश पूर्णपणे सावरू शकलेला नाही.