माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदे यांच्यामुळे उद्धव ठाकरे घराबाहेर पडले नाहीतर मातोश्रीवरच ते असायचे, अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे.
यावेळी रामदास कदम म्हणाले की, उद्धव ठाकरे हे मोदी, शाह यांच्यावर वारंवार टीका करत असतात, कारण त्यांना तेवढेच काम आहे. सकाळी उठल्यापासून फक्त ते टीका करण्याचं काम करतात. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या पोटी असा मुलगा जन्माला आला याची संपूर्ण महाराष्ट्राला खंत आहे.
आज उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्यामुळे घराबाहेर पडले आहेत. तसेच ज्यावेळी त्यांना कोणी विचारणारं नव्हतं त्यावेळी ते बाहेर पडत नव्हते, कुणाला भेटतही नव्हते. तसेच ते मुख्यमंत्री झाल्यानंतरही मंत्रालयात जात नव्हते. पण आता एकनाथ शिंदेंनी त्यांना जबरदस्तीने बाहेर पडायला लावलं आहे, अशी टीका रामदास कदमांनी केली.
पुढे त्यांनी एक खंत व्यक्त केली. मोदी लोकसभेत पुन्हा एकदा मोठ्या फरकाने पंतप्रधान होतील. पण माझी एक खंत आहे ती म्हणजे, महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी मोदी आणि शाह यांच्यावर आणि त्यांच्या कामावर विश्वास ठेवून आली आहे. त्यामुळे आमचचा विश्वासघात होणार नाही याची दक्षता त्यांनी घेणे आवश्यक आहे, असेही रामदास कदम म्हणाले.