लोकसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांचे लोणावळ्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी शरद पवार गटात परतले आहेत. अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी आता शरद पवारांना पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आता लोणावळ्यात अजित पवारांना मोठा झटका बसला आहे.
शरद पवारांना पाठिंबा देताना अजित पवारांचे कार्यकर्ते म्हणाले की, बाप बाप असतो, आमचा बाप हा दहा दादा तयार करू शकतो. पण हे दादांना शक्य होणार आहे का? तसेच दादा जनतेचा नाही तर स्वत:चा विकास करायला गेले आहेत. पण आम्हाला संविधान वाचवायचे आहे. त्यासाठी आम्ही शरद पवारांची तुतारी फुंकतो.
पुढे कार्यकर्त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. आम्हाला अजित पवारांच्या अनेक गोष्टी खटकल्या आहेत. आपण ज्या भाजपबरोबर एवढे वर्ष विरोधात लढलो, आज त्यांच्याबरोबरच काम करायचे हे न पटण्यासारखे आहे. तसेच आम्ही शरद पवारांच्या विचारांशी सहमत असून आम्ही त्यांचा वारसा पुढे नेणार आहे, असे कार्यकर्ते म्हणाले.
सध्या राज्याला तोडून, राज्यातील पुरोगामी संस्कृती तोडून, पक्ष मोडून अनेकांची घरे उद्ध्वस्त करण्याची कामे सुरू आहेत. पण शरद पवार हे रोजगार देणारे आणि लोकशाही टिकवणारे नेते आहे. अजित पवार हे फक्त खुर्ची वाचवण्यासाठी भाजपसोबत गेले आहेत, असा आरोपही कार्यकर्त्यांनी केला आहे.
दरम्यान, हे कार्यकर्ते जुलैपासून अजित पवार गटात होते. पण आता या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना धक्का देत शरद पवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अजित पवारांना लोणावळ्यात मोठा धक्का मिळाल्याचे मानले जात आहे.