आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. कलम 370 हटविल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जम्मू-काश्मीरमध्ये आले आहेत. तर पंतप्रधान मोदी श्रीनगरमध्ये हजारो कोटींच्या विकासकामांचे उदघाटन आणि लोकार्पण करणार आहेत. तसेच ते श्रीनगरमधील बक्षी स्टेडियममध्ये ‘डेव्हलप इंडिया, डेव्हलप जम्मू आणि काश्मीर’ कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. जेथे कलम 370 हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीरच्या त्यांच्या पहिल्या भेटीदरम्यान एका सार्वजनिक सभेला संबोधित करणार आहेत.
पंतप्रधानांच्या स्वागतासाठी एका तरूण गायकाने खास गाणे तयार केले आहे. जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील एका तरुण गायकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करणारे गाणे तयार केले आहे. पंतप्रधानांचे मोठा चाहता असल्याचा दावा करणाऱ्या इम्रान अझीझ या तरूणाने मोदींचे स्वागत करणारे आणि कलम 370 रद्द करण्यासह त्यांच्या सरकारने उचललेल्या पावलांचे कौतुक करणारे गाणे तयार केले आहे. हे गाणे सुमारे तीन मिनिटांचे आहे.
‘मोदी आयेंगे, मोदी आयेंगे, कमल खिलेंगे, झंडा लहराएंगे’ अशी या खास गाण्याची सुरुवात आहे. तर ANI शी बोलताना अझीझ म्हणाला की, “मी ऐकत होतो की मोदीजी काश्मीरमध्ये येत आहेत. त्यामुळे मी त्यांच्यासाठी काहीतरी गाण्याचा विचार केला. मी त्यांचा खूप मोठा चाहता आहे. मी त्यांच्या कार्यशैलीने प्रभावित झालो आहे. तर मला त्यांच्यावर गाणे तयार करायला एक आठवडा लागला. तसेच मी तयार केलेल्या गाण्यात काही चूका होत्या, पण साजाद भाई आणि इश्तियाक भाई यांनी मला मदत केली.
पुढे पंतप्रधान मोदींच्या काश्मीर भेटीबद्दलचा आनंद आणि अपेक्षा सांगताना तो म्हणाला की, “मी खूप आनंदी आहे. मला त्यांच्याकडून खूप आशा आणि अपेक्षा आहेत. काश्मीरमध्ये खूप आव्हाने आहेत. अनंतनागमध्ये बेरोजगारी आणि रुग्णालयांची समस्या आहे. तरुणांचा अंमली पदार्थांकडे कल आहे. त्यामुळे आम्हाला आशा आहे की पंतप्रधान मोदी सर्व काही ठीक करतील”, असे अझीझ म्हणाला.
पंतप्रधान मोदींना भेटायला आवडेल का, असे विचारले असता अझीझ म्हणाला, “व्हायरल होईल असे गाणे तयार करण्याचा मी कधीच विचार केला नव्हता. मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे. यामुळे मला खूप आनंद होईल. ते खूप काम करतात. तसेच ते केवळ भारताचेच नाही तर संपूर्ण जगाचे नेते आहेत.”
दरम्यान, कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीरच्या पहिल्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी अनेक विकास प्रकल्पांचे अनावरण करणार आहेत. दोन आठवड्यांहून अधिक काळातील पंतप्रधान मोदींचा हा दुसरा जम्मू-काश्मीर दौरा आहे. 20 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भेटीदरम्यान जम्मूमध्ये रॅलीला संबोधित केले होते.