आज (7 मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. कलम 370 हटविल्यानंतर पहिल्यांदाच ते जम्मू-काश्मीरमध्ये आले आहेत. आज पंतप्रधान मोदी श्रीनगरमध्ये हजारो कोटींच्या विकासकामांचे उदघाटन आणि लोकार्पण करणार आहेत. तसेच पंतप्रधान मोदींनी श्रीनगरमधील बक्षी स्टेडियममध्ये ‘डेव्हलप इंडिया, डेव्हलप जम्मू आणि काश्मीर’ कार्यक्रमात एका सार्वजनिक सभेला संबोधित केले.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, “हेच नवे जम्मू आणि काश्मीर आहे ज्याची आपण अनेक दशकांपासून वाट पाहत होतो. हेच ते नवे जम्मू-काश्मीर आहे ज्यासाठी डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी बलिदान दिले होते. या नव्या जम्मू-काश्मीरच्या डोळ्यांत भविष्य उजळले आहे, या नव्या जम्मू-काश्मीरमध्ये आपल्या हेतूंमध्ये आव्हानांवर मात करण्याचे धैर्य आहे.
“एक काळ असा होता की जे कायदे देशात लागू होते ते काश्मीरमध्ये लागू होत नव्हते. एक काळ असा होता की संपूर्ण देशात गरीब कल्याणकारी योजना राबवल्या जात होत्या पण जम्मू-काश्मीरमधील माझ्या बंधू-भगिनींना त्यांचा लाभ घेता आला नाही. पण आता बघा काळ कसा बदलला आहे. आज तुमच्यासाठी तसेच संपूर्ण भारतासाठी योजना श्रीनगरपासून सुरू झाल्या आहेत”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
तुमचे मन जिंकण्यासाठी मी खूप मेहनत घेत आहे आणि भविष्यातही हा प्रयत्न सुरूच राहणार आहे. ही मोदींची हमी आहे. पृथ्वीवर स्वर्गात आल्याची ही भावना शब्दांच्या पलीकडची आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.