आज लोणावळ्यामध्ये शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात शरद पवार उपस्थित होते. तर यावेळी जाहीर सभेला संबोधित करताना शरद पवार यांनी अजित पवार गटातील आमदार सुनील शेळके यांच्यावर निशाणा साधला. शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना धमकवणाऱ्या सुनील शेळकेंना शरद पवारांनी गंभीर इशारा दिला आहे.
सुनीळ शेळकेंना इशारा देताना शरद पवार म्हणाले की, मला समजलं की, तुम्ही कार्यकर्ते आणि पदाधिकारी इथे येतायत म्हणून धमकी दिली. पण मी त्यांना सांगू इच्छितो की, सुनील शेळके तू आमदार कोणामुळे झाला? तुझ्या सभेला कोण आलं होतं? पक्षाचा अध्यक्ष कोण होतं? तुझ्या त्या अर्जावर माझी सही आहे, हे लक्षात ठेव.
यापुढे जर असं काही केलं तर मला शरद पवार म्हणतात, हे विसरू नका. मी कधी त्या वाटेने जात नाही, पण गेलो तर मी कोणाला सोडतही नाही, असा गंभीर इशारा शरद पवारांनी सुनील शेळकेंना दिला आहे.
दरम्यान, लोणावळ्यात होणाऱ्या शरद पवारांच्या सभेला कार्यकर्त्यांनी जाऊ नये असं सुनील शेळकेंनी आपल्याला धमकावले आहे, अशी तक्रार कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे केली होती. त्यामुळे शरद पवारांनी भरसभेत सुनील शेळकेंना कडक असा इशाला दिला.