संदेशखाली हिंसाचार प्रकरणातील प्रमुख आरोपी निलंबित तृणमूल नेता शहाजहान शेखला अखेर काल म्हणजे बुधवारी सीबीआयच्या ताब्यात देण्यात आले.
कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर गुन्हे अन्वेषण विभागाने बुधवारी शहाजहान शेखचा ताबा केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)कडे सोपवला. यानंतर सीबीआयने शेख शहाजहानला सीआयडीकडून हस्तांतरित केल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी जोका ईएसआय रुग्णालयात नेले.
पश्चिम बंगाल सीआयडीला नोटीस जारी करताना, कलकत्ता उच्च न्यायालयाने बुधवारी निरीक्षण नोंदवले होते की ईडी अधिकाऱ्यांवरील हल्ल्याचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा आणि आरोपी शहाजहान शेखला आज एजन्सीकडे ताब्यात देण्यात यावे.
या प्रकरणी राज्य पोलिसांनी मुद्दाम हलगर्जीपणा केल्याचे निरीक्षणही कोलकाता उच्च न्यायालयाने नोंदवले. हा आरोपी राजकीयदृष्ट्या प्रभावशाली व्यक्ती असून त्याचा तपास सीबीआयकडे सोपवावा आणि आज दुपारी 4:15 पर्यंत आरोपींना ताब्यात द्या,” असे उच्च न्यायालयाने म्हटले होते.
संदेशाखाली हिंसाचाराचे प्रकरण उघडकीला येऊन अनेक दिवस लोटल्यानंतर , 29 फेब्रुवारी रोजी, टीएमसी नेता शहाजहान शेख पश्चिम बंगाल पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पश्चिम बंगालच्या बशीरहाट न्यायालयाने त्याला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
दरम्यान, पश्चिम बंगालचे आमदार आणि भाजप नेत्या अग्निमित्र पॉल यांनी आरोप केला आहे की, शाहजहानने तोंड उघडल्यास राज्य सरकारबाबत अनेक गोष्टी उघड होतील.
शेख यांना संरक्षण दिल्याबद्दल मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर निशाणा साधत पॉल म्हणाल्या की “ममता बॅनर्जी त्याला सरळसरळ संरक्षण देत आहेत कारण शेख शहाजहानसारख्या गुंडाने तोंड उघडले तर राज्य सरकारबद्दल अनेक गोष्टी उघड होतील. नाहीतर या सरकारला त्याची गरज का आहे? पश्चिम बंगाल चालवणाऱ्या सरकारचा गुंडाशी काय संबंध?
“लोकसभेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. शेख शाहजहान आणि त्याचे गुंड बशीरहाट आणि आजूबाजूच्या भागातील प्रत्येक घराघरात जातात, त्यांना धमक्या देतात, गोळ्या घालतात आणि भाजपला मतदान करण्यापासून परावृत्त करतात. शेख शाहजहान सर्व अवैध धंदे करतो. त्याच्या निधीचा फायदा सरकारला होतो. ,” असे पॉल यांनी म्हंटले आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी रोहिंग्यांना अधिकृत कागदपत्रे पुरवतात असा आरोप करत पॉल म्हणाल्या की , “शाहजहान शेख आणि त्याचे गुंडच रोहिंग्यांना सीमेवरून आणतात. पश्चिम बंगालमधील राष्ट्रवादी मुस्लिम टीएमसीला मतदान करणार नाहीत. त्यामुळे फक्त रोहिंग्या त्यांना मतदान करतील अशी त्यांना आशा आहे. ममता बॅनर्जींना त्यांच्यासाठी आधारकार्ड, मतदार कार्ड आणि रेशनकार्ड अशी सगळी व्यवस्था करतात. त्यामुळे शेख शाहजहानला पकडले तर तो सगळे पत्ते उघडे करेल अशी भीती ममता बॅनर्जीना आहे.
बंगाल सरकारने यापूर्वी कोलकाता उच्च न्यायालयाने मंगळवारी पोलिसांच्या गुन्हेगारी तपास विभागाला किंवा सीआयडीला आदेश देऊनही शाहजहानचा ताबा सीबीआयकडे देण्यास नकार दिला होता.