आर्थिक गुन्हे आणि शेकडो कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांच्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) राजस्थान आणि महाराष्ट्रात एकाच वेळी 67 ठिकाणी छापेमारी केली आहे. अंदाजे 820 कोटी रुपयांच्या संशयास्पद IMPS (इमिजिएट पेमेंट सर्व्हिस) व्यवहारांशी संबंधित या प्रकरणात UCO बँकेच्या अनेक खात्यांची चौकशी केली जात आहे.
सीबीआयने या प्रकरणी छापेमारी करताना 820 कोटी रुपयांच्या व्यवहाराबाबत एक निवेदन जारी केले. त्यानुसार 6 मार्च रोजी जोधपूर, जयपूर, जालोर, नागौर, बारमेर, फलोदीसह राजस्थानमधील अनेक शहरांमध्ये छापेमारी करण्यात आली.
राजस्थान व्यतिरिक्त, UCO बँक खात्यांमधून संशयास्पद व्यवहारांच्या संदर्भात पुणे, महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर छापे टाकण्यात आले. या कारवाईदरम्यान, यूको बँक आणि आयडीएफसीशी संबंधित सुमारे 130 दोषी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
CBI अधिकाऱ्यांनी 6 मार्चच्या कारवाईदरम्यान 43 डिजिटल उपकरणे, 40 मोबाईल फोन, 2 हार्ड डिस्क आणि 1 इंटरनेट डोंगल आणि इतर अनेक गुन्हेगारी वस्तू जप्त केल्या आहेत. तसेच सीबीआय त्यांचे फॉरेन्सिक विश्लेषण करत आहे. तसेच सीबीआयने आपल्या तपास प्रक्रियेत घटनास्थळी सापडलेल्या 30 संशयितांचाही समावेश केला आहे.