अयोध्येत प्रभू राम ललाचे मंदिर झाले, देश मोठा होतोय, प्रगती करतोय, अवघ्या जगात भारताचे नाव आदराने घेतले जाऊ लागले आहे आणि हिंदू समाज संघटित झाला आहे हे खरे आहे. परंतु हिंदू समाजात फूट पाडणाऱ्या शक्तीसुद्धा कार्यरत आहेत. त्यामुळे हिंदू समाजात फूट पडू द्यायची नसेल तर सामाजिक समरसता प्रत्येक हिंदूंच्या जीवनाचा अविभाज्य भाग व्हायला हवी असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ. भा. कार्यकारिणी सदस्य सुहास हिरेमठ यांनी केले. ते छत्रपती संभाजीनगर येथे कै. जनुभाऊ रानडे यांच्या 16 व्या स्मृती व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी प्रांत संघचालक मा. अनिलजी भालेराव व विहिंप देवगिरी प्रांत अध्यक्ष संजयआप्पा बारगजे आणि राष्ट्रहित जनाधार मंडळाचे राजीव जहागीरदार व्यासपीठावर उपस्थित होते.
सुहास हिरेमठ यांनी भाषणाच्या सुरुवातीस पू. श्री गुरुजी यांच्या स्मृती दिनानिमित्त त्याच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. श्री गुरुजी त्यांच्या मातेचे एकुलते एक पुत्र होते. त्यांच्या अगोदर जन्माला आलेली सात अपत्य दगावली होती. तरीही गुरुजींनी देशासाठी सर्वस्व अर्पण करून देशसेवा केली. त्याचप्रमाणे जनुभाऊ रानडे यांनी भारत मातेची शेवटपर्यंत सेवा केली. त्यांनी विश्व हिंदू परिषदेचे काम केले. शिवाजीराव भोसले यांच्यासारख्या उत्कृष वक्तृत्वशैली असलेल्या तरुणाला संघटनेशी जोडले. संपूर्ण जीवन समर्पित करून जनुभाऊंनी कार्य केलं. पंढरपूर आणि आळंदीच्या अधिवेशनात शिवाजीराव भोसले उपस्थित राहिले होते, असे ते म्हणाले.
सुहास हिरेमठ यांनी वर्तमान परिस्थितीवर प्रकाश टाकताना म्हंटले, “भारतीय समाजाची राष्ट्रभक्ती भावना आणि हिंदू जागृती ही समुद्राच्या लाटांसारखी कधी खाली कधी वर होत आलेली आहे. आज रामलला ची प्राणप्रतिष्ठा होणे म्हणजे हिंदू समाज जागृत असल्याचं द्योतक आहे. पण हिंदू समाजाला पुन्हा झोपण्याची मोठी वाईट सवय आहे. त्यामुळे आज भारत मोठा होत असताना, समाज सुसंघटित आणि सामर्थ्यशाली होत असताना हा समाज पुन्हा निद्रिस्त होणार नाही यासाठी प्रत्येक हिंदूला विचार व कृती करावी लागणार आहे, असे त्यांनी सांगितले.