आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील करोडो महिलांना मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या (एलपीजी) किमती 100 रुपयांनी कमी केल्या आहेत. याबाबतची माहिती पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर दिली आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट करत लिहिले आहे की, आज महिला दिनी आमच्या सरकारने एलपीजी सिलेंडरची किंमत 100 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशभरातील लाखो कुटुंबांवरील आर्थिक भार लक्षणीयरीत्या कमी होईल आणि विशेषत: आपल्या स्त्रीशक्तीला फायदा होईल. स्वयंपाकाचा गॅस अधिक किफायतशीर बनवून, आम्ही कुटुंबांच्या कल्याणासाठी आणि निरोगी वातावरणाची खात्री करण्याचे देखील ध्येय ठेवतो. हे महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांच्यासाठी ‘जीवन सुलभता’ सुनिश्चित करण्याच्या आमच्या वचनबद्धतेशी सुसंगत आहे.
https://twitter.com/narendramodi/status/1765938424723202381
लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून उज्ज्वला योजनेंतर्गत उपलब्ध असलेल्या एलपीजी सिलिंडरवरील अनुदान एक वर्षाने वाढवले आहे. लाभार्थ्यांना आता केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेंतर्गत 31 मार्च 2025 पर्यंत एलपीजी सिलिंडरवर सबसिडी मिळेल. सध्या एका कुटुंबाला एका वर्षात 12 सिलिंडरवर प्रति सिलिंडर 300 रुपये अनुदान दिले जाते.
सध्या संपूर्ण देशात 31 कोटी 40 लाख एलपीजी कनेक्शन आहेत. त्यापैकी 10 कोटींहून अधिक कनेक्शन उज्ज्वला योजनेंतर्गत आहेत. तर एलपीजीच्या किमती कमी केल्याने महागाईच्या झळा सोसणाऱ्या जनतेला काहीसा दिलासा मिळणार आहे.