पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगण्यातील संदेशखालीचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेख शाहजहानला ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयाच्या सूचनेवरून सीबीआयचे पथक गुरुवारी संदेशखाली येथे पोहोचले. त्यांच्यासोबत केंद्रीय दलाचे जवानही मोठ्या संख्येने उपस्थित होते. तेथे त्यांनी प्रथम बशीरहाट येथे जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. तेथे शेख शहाजहानविरुद्ध राज्य पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरची प्रत आणि त्यासंबंधीची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. या प्रकरणाच्या तपासात सीबीआयच्या पथकाने शाहजहानविरुद्ध पोलीस छावणीत महिलांनी नोंदवलेल्या जबानीची प्रतही ताब्यात घेतली.
यानंतर सीबीआयचे पथक थेट शेख शाहजहानच्या घरी पोहोचले. त्यांनी बराच वेळ तेथे शोधमोहीम राबवली. यानंतर सीबीआयची टीमही शहाजहानच्या नावावर असलेल्या मार्केटमध्ये पोहोचली. अधिकारी तेथे अनेकांना भेटले. यानंतर सीबीआयच्या पथकाने संदेशखाली आणि परिसरातील शेख शाहजहानच्या नावावर असलेल्या इतर मालमत्तांचाही आढावा घेतला. यावेळी सीबीआयच्या महिला अधिकाऱ्यांनीही काही महिलांशी संवाद साधला.
दरम्यान, याआधी 5 जानेवारीला याच संदेशखालीमध्ये ईडीच्या टीमला शोधमोहीम राबवताना मोठ्या संख्येने अज्ञात लोकांच्या हल्ल्याला सामोरे जावे लागले होते. या हल्ल्यात ईडीचे अधिकारी गंभीर जखमी झाले होते. एका अधिकाऱ्याच्या डोक्यालाही दुखापत झाली होती. त्यानंतर आता तब्बल दोन महिन्यांनंतर सीबीआयचे पथक शेख शहाजहानच्या घरी पोहोचले. या भेटीदरम्यान अनेक महत्त्वाची माहिती मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. या माहितीच्या आधारे आरोपी शेख शहाजहानला लवकरच विविध प्रश्न विचारण्यात येणार आहेत.